अतिक्रमणाबाबत ‘बांधकाम’चे कागदी घोडे
By Admin | Published: April 27, 2016 11:51 PM2016-04-27T23:51:05+5:302016-04-27T23:55:50+5:30
अरुण वाघमोडे, अहमदनगर बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयामार्फत शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ४०० पेक्षा जास्त अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे़
अरुण वाघमोडे, अहमदनगर
बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयामार्फत शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ४०० पेक्षा जास्त अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे़ अतिक्रमणधारकांनी मात्र, या नोटिसीला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले आहे़ बांधकाम विभागाने नोटिशीपलीकडे पुढे काहीच कार्यवाही न करता फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार केला असल्याचे स्पष्ट होत आहे़
नगर- मनमाड व नगर-औरंगाबाद हे दोन महामार्ग जागतिक बँक प्रकल्प उपविभागांतर्गत येतात़ या दोन्ही महामार्गांवर रस्त्यापासून १५ मीटरच्या आत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत़ बांधकाम विभागाने नगर-मनमाड रस्त्यावरील नगर ते कोल्हारपर्यंत तर नगर-औरंगाबद रस्त्यावरील नगर ते घोडेगावपर्यंतच्या व्यावसायिकांना नोटिसा बजावून सात दिवसांच्या आत स्वत:हून अतिक्रमण काढून टाकावीत, असे सांगितले आहे़ व्यावसायिकांना नोटीस देऊन महिना उलटला तरी एकाही व्यावसायिकाने स्वत:हून अतिक्रमण काढलेले नाही़ वर्षाभरापूर्वीही बांधकाम विभागाने अशाच नोटिसा बजावल्या होत्या़ त्यावेळी एकही अतिक्रमण हटले नाही तर ज्यांनी अतिक्रमण काढले होते, त्यांनी पुन्हा तेथे व्यवसाय सुरू केला़ बांधकाम विभागाने मात्र, ठोस अशी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे अतिक्रमणाबाबत फक्त कागदे रंगविण्याचा प्रकार होत असल्याचे स्पष्ट होते़ नगर-मनमाड महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे़