कोरोना काळात पालकमंत्री गायब कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:49+5:302021-04-13T04:20:49+5:30
आढळगाव : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना बेड मिळत ...
आढळगाव : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन पुरवठा नाही. रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असताना प्रशासकीय पातळीवर समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त असणाऱ्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळ नसेल तर जबाबदारी अन्य मंत्र्यांकडे देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या श्रीगोंदा तालुक्यात दररोज शंभरच्यावर रुग्णांची भर पडत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून कोरोना चाचण्या सुरू आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना कोविड केंद्रावर किंवा गृहविलगीकरण करून परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा लागतो. हे सर्व सोपस्कार पार पाडताना आरोग्य विभागाची दमछाक सुरू आहे. तालुक्यात आरोग्य विभागातील ४० टक्के पदे रिक्त असतानाही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.