अंगणवाडी सेविकांनी आता कशी शिकायची इंग्रजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:29+5:302021-07-31T04:22:29+5:30
अहमदनगर : पोषण आहारासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे ...
अहमदनगर : पोषण आहारासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांची अडचण होत असून आता यासाठी इंग्रजी शिकायची का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित झाला आहे. त्यामुळे या ॲपमध्ये मराठीचीही सोय हवी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांमधून केली जात आहे.
स्तनदा माता, गरोदर महिला, तसेच बालकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहेत. या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड करून त्यात दैनंदिन माहिती भरायची आहे. परंतु, ॲपमध्ये ही सर्व माहिती इंग्रजी भाषेत भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. अनेक अंगणवाडी सेविकांना इंग्रजी येत नसल्याने आता आम्ही केवळ या ॲपसाठी इंग्रजी शिकायची का, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांमधून उपस्थित केला जात आहे.
नगर जिल्ह्यात ४ हजार ८०० मोठ्या, तर ८३३ मिनी अशा एकूण ५ हजार ६३३ अंगणवाड्या आहेत. त्यावर एकूण ५ हजार ५०० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना या इंग्रजी ॲपचा ताप झाला आहे. शासनाने दिलेले मोबाईलही चालत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला स्वत:चा मोबाईल या कामासाठी वापरावा लागत आहे.
--------------
पोषण आहाराची माहिती अद्ययावत करण्यासाठी ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजी भाषेचाच एकमात्र पर्याय दिला आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांच्या सोयीसाठी त्यामध्ये मराठीचाही पर्याय द्यावा. याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे, अशी माहिती जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दिली.
------------------
शासनाने माहिती भरण्यासाठी दिलेले मोबाईल बंद पडले असून, आम्हाला स्वत:चे मोबाईल कामासाठी वापरावे लागत आहेत. ॲपमध्ये इंग्रजी भाषेऐवजी मराठी भाषा हवी. अनेक ठिकाणी नेटवर्कअभावी मोबाईल चालत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या या मागण्यांचा विचार व्हावा.
- शोभा लांडगे, अंगणवाडी सेविका, संंगमनेर
----------------
जिल्ह्यातील अंगणवाड्या - ५६३३
एकूण अंगणवाडी सेविका - ५५५५
-------------
पोषण ट्रॅकरवरील कामे
जिल्ह्यातील गरोदर महिला ते स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली, त्यांचे वजन या सारखी माहिती अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरवर भरण्याच्या सूचना आहेत. यासाठी त्यांना मोबाईल देण्यात आले आहेत. राज्य शासनाला सर्व जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर मिळावी, हा यामागचा हेतू आहे.
------------------