“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे”
By सुदाम देशमुख | Published: April 2, 2023 02:39 PM2023-04-02T14:39:54+5:302023-04-02T14:41:08+5:30
- संजीव भोर यांची संजय राऊत यांच्यावर टीका
अहमदनगर: सावरकर दाढी वाढवणाऱ्यांच्या विरोधात होते मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाढी काढणार का? असा प्रश्न उपस्थित करणारे संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात किती भरकटणार असा सवाल शिवसेनेचे(शिंदे गट) प्रवक्ते संजीव भोर यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनाही अनेक वर्ष दाढी होती. मग राऊतांना बाळासाहेबही सावरकरांच्या विचाराच्या विरोधात होते असे म्हणायचे आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती म्हणजे सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांमधले होते असेच तर राऊत यांना सांगायचे नाही ना?
शिंदेंनी सावरकरांचे साहित्य वाचले आहे का? असा प्रश्न करणाऱ्या राऊतांना स्वतःस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहित नसावं? दररोज घटना बचावचा रट लावताना बाबासाहेब आंबेडकरांचे व बाबासाहेबांविषयीचे साहित्य संजय राऊत यांनी तरी वाचले आहे का? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. हे महाशय कधीतरी स्वतःचे अंतरंग तपासून बघतील की नाही? उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे.
संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी टाइमपास व करमणुकीचं साधन बनले आहेत. महाराष्ट्रातल्या गावागावात जत्रां निमित्त तमाशा असतो. जत्रेच्या दिवशी रात्री तमाशाचा कार्यक्रम सादर केल्यानंतर या तमाशातले कलाकार दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांसमोर आपली कला सादर करून हजेरी देत असतात. तशी संजय राऊत यांची दररोज सकाळी महाराष्ट्रातील जनतेसाठी माध्यमांसमोर हजेरी असते. या माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ सापडत नाही अशी त्यांची अवस्था आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"