गावात पाऊस किती? १०० की ५४ मिमि?; दोन पर्जन्यमापकांवर वेगवेगळी नोंद
By शिवाजी पवार | Published: October 4, 2023 03:30 PM2023-10-04T15:30:22+5:302023-10-04T15:57:52+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार : शेतकरी संभ्रमात
शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील उंदिरगाव येथे सोमवारी अतिवृष्टी होऊन सोयाबीन, मका, कपाशी पिके पाण्याखाली गेली. मात्र महसुली मंडळातील या गावातील दोन पर्जन्यमापकांवर पावसाची वेगवेगळी नोंद झाली आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पर्जन्यमापकावर १०० मिलिमीटर अर्थात अतिवृष्टी तर महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर केवळ ५४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या प्रकाराविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सोमवारी सायंकाळी चार वाजता गावात तुफान पाऊस आला. यावर्षीचा हा सर्वाधिक पाऊस होता. त्यामुळे शेतामध्ये पाण्याचे तळे साचले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. कपाशी, मका ही पिकेही पाण्यात आहे. मात्र एवढा पाऊस होऊनही महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर केवळ ५४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. साखर कारखान्याची यंत्र मात्र अतिवृष्टी दाखवत आहे. गावात महावेधचे आणखी एक पर्जन्यमापक आहे. तेथील पावसाची नोंद अद्याप प्राप्त झालेली नाही. पर्जन्यमापक हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. अतिवृष्टीची नोंद त्यामुळे घेतली जाते. शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसीलदारांकडे सदोष पर्जन्यमापका विरुद्ध लेखी तक्रार केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी महसूल यंत्रणेला उंदिरगाव येथील पिकाच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामाचे आदेश दिले आहेत.