बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:03+5:302021-05-29T04:17:03+5:30
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका नागरिकांना बसला. रुग्णालयात दाखल होण्यापासून बेड न ...
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका नागरिकांना बसला. रुग्णालयात दाखल होण्यापासून बेड न मिळणे, औषधांची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या या लाटेत जाणवल्या. त्यानंतर आता जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाटही येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या लाटेत सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांना होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर असे असेल तर त्यादृष्टीने उपाययोजना करणे प्रशासनाचे काम आहे. प्रशासनाने अशा उपाययोजना केल्याही आहेत, मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांचा मोठा तुटवडा आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत ९८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५५५ उपकेंद्र आहेत, मात्र या ठिकाणी कोठेही बालरोगतज्ज्ञ नाही. जिल्हा रुग्णालयात ३, तर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात २ बालरोगतज्ज्ञ आहेत. मात्र एवढ्या कमी संख्येने असणारे डॉक्टर मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या रुग्णांना कशी सेवा देणार, मागील लाटेप्रमाणे या लाटेतही उपाययोजना तोकडी पडणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
-----------
१) जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - ९८
बालरोगतज्ज्ञ -०
उपजिल्हा रुग्णालय - २
बालरोगतज्ज्ञ - २
जिल्हा रुग्णालय - १
बालरोगतज्ज्ञ -३
-----------
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -२,५६,७८७
बरे झालेले रुग्ण -२,४०,९५०
उपचार घेत असलेले रुग्ण -१२,८०५
-------
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
शहरात तुलनेत खासगी रुग्णालये असतात. शासकीय रुग्णालयांतदेखील अल्प का होईना स्टाफ आहे. दुर्दैवाने तिसरी लाट आली तर गावातील परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागात बालरोगतज्ज्ञांचा तुटवडा आहे. परिणामी शहरात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------------
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनासह आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केलेली आहे. ग्रामीण भागातील बेड वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरेसा साठा तसेच इतर सर्व आरोग्यविषयक उपाययोजना सज्ज आहे.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी