सारोळा सोमवंशीत ऑनलाईन शाळेला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:54+5:302021-06-26T04:15:54+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या ऑनलाईन शाळेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या ऑनलाईन शाळेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे १५ जूनला सर्वत्रच शाळेची घंटा वाजली. शाळा भरली मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवायची परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शिक्षकांनी उपस्थित राहून ऑनलाईन शाळा भरवली.
मुख्याध्यापक अरुण फंड व युवानेते राहुल आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर घेऊन प्रत्येक वर्गाचा हॉट्सॲपवर ग्रुप बनविले. मात्र केवळ हॉट्सॲपवर अभ्यास देण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थी झूम ॲपद्वारे कॉन्फरन्स घेऊन संतोष मगर, रवींद्र पाडळे, मनोरमा मांडगे या शिक्षकांनी स्वत: शाळेतून अभ्यासक्रम देत शाळा बंद असतानाही ऑनलाईन शाळा भरवत कुणीही विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली.
शिक्षकांची शिक्षणाविषयीची प्रामाणिक धडपड पाहून सरपंच उज्ज्वला आढाव व उपसरपंच अंजाबापू कवाष्टे यांनी पालकांमध्ये ऑनलाईन शाळेविषयी जनजागृती केली. मनोरमा मांडगे या शिक्षिकेने तर स्वत:च्या आवाजात तयार केलेल्या स्वनिर्मित व्हिडिओद्वारे सुलभ व सोप्या पद्धतीने दिलेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना अगदी सहज ध्यानात बसत आहे.