श्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 08:21 PM2018-04-20T20:21:55+5:302018-04-20T20:24:45+5:30
चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे.
श्रीरामपूर : चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे.
बेलापूर खुर्दपासून दोन किलोमीटर अंतरावर चांदेगाव आहे. या ठिकाणी चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिरात जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरु होते. शुक्रवारी दुपारी मजुरांना तेथे एक मानवी सांगाडा आढळून आला. एखाद्या साधूने येथे समाधी घेतली असावी, असे गावकऱ्यांना प्रारंभी वाटले. मात्र, पुढे खोदकाम सुरू झाल्यानंतर आणखी काही मानवी सांगाड्यांचे अवशेष सापडले. या सांगाड्यांच्या कवटीभोवती माठ आढळून आला. त्यामुळे हे अवशेष पुरातन असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.
चांदेगावपासूनच दहा किलोमीटर अंतरावर असणाºया दायमाबाद येथे पूर्वी उत्खनन करण्यात आले होते. तेथे अशाच प्रकारचे अवशेष मिळून आले. त्यामुळे या जागेवर उत्खनन केल्यास पुरातन अवशेष सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभ्यासक प्रा.गणी पटेल यांनी या संदर्भात पुरातत्व विभागाकडे छायाचित्रे पाठविली आहेत. गावातील संजय भांड, श्रीनिवास मारुती श्ािंदे, दादासाहेब चांगदेव उबाळे, जनार्दन रामनाथ गायकवाड, दादा भांड, गवजी नाना शिणारे, अमोल भांड, संकेत कणसे आदींनी तहसीलदार अनिल
दौंडे यांना घटनेची माहिती दिली आहे.
चंद्रेश्वर मंदिराजवळ असणारे लिंबाचे जुने झाड पाचशे वर्षापूर्वीचे असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे सांगाडे पुरातन काळातील असावेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे काही शास्त्रज्ञ भेट देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.