"ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी"
By साहेबराव नरसाळे | Published: February 28, 2023 04:20 PM2023-02-28T16:20:28+5:302023-02-28T16:24:18+5:30
अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या ...
अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यसाठी महिला आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये दिली. राज्य महिला आयोग आपल्या दरी या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चाकणकर म्हणाल्या, ओमान या देशात फसवून नेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ महिला आयोगाला आला होता. त्यावरून संबंधित महिलेचा शोध घेतला असता ती त्या जागेवर आढळून आली नाही. राज्यातील महिलांना परदेशात काम देतो, असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांचे कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांना अत्यंत छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ आम्हाला आला होता. त्यावरून मुंबईत ओशिवरा पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या महिलांच्या शोधासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला आयोग पाठपुरावा करीत आहे. पुढील ५ ते ६ महिन्यात सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित होते.