नगरमध्येही पेट्रोलची शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:07+5:302021-02-16T04:22:07+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी पॉवर पेट्रोलचा दर ९८.५९ रुपये इतका होता. तर पेट्रोलचा दर ९५.२२ ...
अहमदनगर : जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी पॉवर पेट्रोलचा दर ९८.५९ रुपये इतका होता. तर पेट्रोलचा दर ९५.२२ रुपये इतका होता. डिझेलचा दरही ८५ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये ही दरवाढ एक रुपयाच्या पुढे सरकली असल्याने सामान्य वर्गातूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी पॉवर पेट्रोलचा दर शंभरीपर्यंत पोहोचला. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २९ आणि ३२ पैशांनी वाढ केली. त्यामुळे अनेक ठिकाणी पॉवर पेट्रोलचे दर शंभरीपर्यंत पोहोचले आहेत. नगर जिल्ह्यात अद्याप पेट्रोलचा दर शंभर झाला नसला तरी त्यासाठी केवळ ४१ पैसे कमी आहेत. तो दर मंगळवारी शंभरीपार गेलेला असेल. काही जुन्या यंत्रावर पेट्रोलचे दर तीन अंकांमध्ये गणना करण्याची सुविधा नसल्याने विक्री थांबविण्याची वेळ येऊ शकते. बहुतांश पेट्रोलपंपावर इलेक्ट्रानिक सिस्टिम असल्याने तीन अंकांची सुविधा उपलब्ध असल्याने तशी कोणतीही अडचण येणार नसल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.
------------------
पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ ही सामान्य लोकांना असह्य झाली आहे. गेल्या महिनाभरापासून दररोज २५ पैशांनी दर वाढत आहेत. मात्र, या दरवाढीचा वेग गेल्या तीन दिवसांत सर्वांत जास्त राहिला. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेली पेट्रोलमधील दरवाढ ही एक रुपयापेक्षाही जास्त झाली आहे. या दरवाढीबाबत सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. या दरवाढीने रोड वाहतूकदारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
-चारुदत्त पवार, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन, अहमदनगर
----------------
अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल दर
सोमवारचे पेट्रोल- डिझेल दर
पॉवर पेट्रोल- ९८.५९ रुपये प्रतिलिटर
पेट्रोल- ९५.२२ रुपये प्रतिलिटर
डिझेल- ८४.७५ रुपये प्रतिलिटर
-------------
पेट्रोल दरवाढीमुळे महागाई भडकणार आहे. बाजारपेठेतील सर्वच वस्तू आणि पदार्थांचे दरही वाढणार आहेत. सर्वांनाच या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांत आधी सामान्य वर्गाला या दरवाढीची झळ पोहोचणार आहे.
- संजय साखरे, व्यापारी
--------------
पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य माणसांना जगणेच कठीण होत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे किराणा मालाचे दरही वाढणार आहेत. गॉस सिलिंडरचा दरही वाढला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
- कल्पना ठोंबरे, नगर