हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात : शेवगाव तालुक्यात विहीरीत पडून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:48 PM2019-05-17T12:48:54+5:302019-05-17T13:22:52+5:30
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गोळेगाव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गोळेगाव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. गावातील अंजना बाबासाहेब फुंदे या विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
गावात पिण्याच्या पाण्याची अवस्था अतिशय दयनीय असल्याने मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी महिलांना धडपड करावी लागत आहे. सोमवार (दि.१३) रोजी सकाळी नऊ वाजता अंजना बाबासाहेब फुंदे ( वय ४५) या पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावालगतच असलेल्या साहेबराव आंधळे यांच्या विहिरीवर गेल्या असता बादलीच्या मदतीने पाणी शेंदत असताना पाय घसरून सात परस खोल विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर मोठी किंकाळी ऐकू आल्याने गावातील बंडू आंधळे, कचरू बडे, कालिदास डमाळे, गणेश आंधळे या युवकांनी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या महिलेला लोखंडी बाज बांधून वर काढले. यानंतर या महिलेस खासगी वाहनाने बोधेगाव येथील रूग्णालयात आणले मात्र गंभीर जखमी असल्याने तेथे प्रथमोपचार करून नगरला हलविण्यात आले.
सदर महिलेची घरची परिस्थिती अतिशय दयनीय आहे पती मणक्याच्या आजाराने अनेक दिवसांपासून अंथरूणावर पडून आहेत. तर भूमीहिन असल्याने एक मूलगा बाहेगावी तर एक मूलगा गावातचं रोजंदारीने काम करतो. यामूळे सदरील महिलेला प्रशासनाकडून वैद्यकीय मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टँकरसाठी तहसिलदारांना निवेदन
शासनाने टँकरच्या माध्यमातून दिलेले पाणी पुरेसे नसून पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत आहे. त्यामुळे नागरीकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. तर महिलांसह लेकरांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने दुष्काळाची पीडा मिटत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गोळेगावसाठी असणा-या टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा गोळेगाव ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.