दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आमरण उपोषण
By चंद्रकांत शेळके | Updated: February 28, 2023 16:59 IST2023-02-28T16:56:17+5:302023-02-28T16:59:14+5:30
सध्या राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदल्या राज्यात एकाच वेळी ॲानलाइन पोर्टलद्वारे होत आहेत.

दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आमरण उपोषण
अहमदनगर : सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र दिल्याने बीडमध्ये जवळपास ७८ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातही संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यातही बोगसगिरी झाल्याचा संशय असल्याने जिल्हा परिषदेने या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने आज (मंगळवारी) जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
सध्या राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदल्या राज्यात एकाच वेळी ॲानलाइन पोर्टलद्वारे होत आहेत. दरम्यान, बीडमध्ये सोयीस्कर बदलीसाठी स्वत: किंवा नातेवाइकांचे बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा प्रकार समोर आला. याची सखोल चौकशी झाली तर ७८ जणांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या सीईओंनी त्या ७८ शिक्षकांचे निलंबन केले आहे. नगर जिल्ह्यातही बदल्यांमध्ये अशी हेराफेरी झाली असण्याची शक्यता असल्याने या बदली झालेल्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेकडून १ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेकडे करण्यात आली. परंतु शिक्षण विभागाने त्याची दखल न घेतल्याने आता या संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे.