शिकारी यहाँ शिकार हो गया! : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:57 PM2017-09-29T15:57:23+5:302017-09-29T15:57:32+5:30
संगमनेर तालुक्यातील येथील आश्वी बुद्रुक शिवारातील चतुरेवस्तीवरील एका शेतक-याच्या शेतातील कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्यावर हल्ला करणारा सैराट बिबट्या अखेर शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजता रात्री खुराड्यात जेरबंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आश्वी : संगमनेर तालुक्यातील येथील आश्वी बुद्रुक शिवारातील चतुरेवस्तीवरील एका शेतक-याच्या शेतातील कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्यावर हल्ला करणारा सैराट बिबट्या अखेर शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजता खुराड्यात जेरबंद झाला आहे.
आश्वी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मंगळवारी रात्री प्रतापपूर शिवारात मोटरसायकलवर हल्ला करून मायलेकीला जखमी केल्याने या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनखात्याने परिसरात पिंजरा लावला. मात्र बिबट्याने दोन दिवसांपासून हुलकावणी देत आश्वी बुद्रुक येथील चतुरे वस्तीकडे आपला मोर्चा वळवत गुरुवारी रात्री संदीप जगन्नाथ चतुरे व सुभाष भिकाजी चतुरे यांच्या गट नंबर ११८ मध्ये असलेल्या मुक्त गोठ्यात प्रवेश करीत गायींवर हल्ला चढवला, मात्रं गायींनी प्रतिकार करण्यास सुरुवात केल्याने बिबट्या सैरभैर झाला. यानंतर बिबट्याने गोठ्यात असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्या फस्त करण्यास सुरुवात केली. पहाटे एक-दीड वाजण्याच्या खुराड्याचा दरवाजा अचानक बंद झाल्याने बिबट्या खुराड्यात अडकला होता. गायांचे हंबरणे ऐकूण चतुरे कुटुंबाला जाग आली. घरातून बाहेर येताच खुराड्याकडे लक्ष गेले असता बिबट्या कोबड्याच्या खुराड्यात हैदोस घालताना दिसला. त्याने तोपर्यंत जवळपास २५ कोबड्या फस्त केल्याचे निदर्शनास आल्याने चतुरे यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाच्या अधिका-यांनी चतुरे याच्या वस्तीकडे धाव घेत खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करीत ताब्यात घेतले असून जोर्वे येथील नर्सरीत हलवण्यात आले आहे. तर मंगळवारी रात्री प्रतापपूर शिवारात मोटरसायकलवर हल्ला करून मायलेकीला जखमी करणारा हाच बिबट्या असण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवली असून बिबट्या दहा वर्ष वयाचा व नव्वद किलो वजनाचा व नर जातीचा असल्याचे सांगितले. बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील ग्रामंस्थानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.