नगर जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा : दोनजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:14 AM2018-10-05T11:14:19+5:302018-10-05T11:18:14+5:30
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला.
अहमदनगर : जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला. त्यात शेवगाव तालुक्यातील दोन शेतमजुरांचा वीज पडून मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वादळी वा-यासह कमी-अधिक पावसाने हजेरी लावली.
गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वा-यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. ब-याच ठिकाणी खरिप पिकांच्या काढण्या, तर बहुतेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्यांची तयारी सुरू आहे. या वादळी वा-यामुळे शेतक-यांची धावपळ उडाली. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे वीज पडून जनार्दन दामोधर खर्चन (वय ५७) व दादासाहेब चंद्रभान पायघन (वय ५३) या शेतक-यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी शेतात बैलाने मशागत करत होते. दुपारी वादळी वा-यासह पाऊस सुरू झाल्याने हे दोघेजण जवळीलच झाडाखाली आसºयाला बसले. तेवढ्यात वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पाथर्डी तालुक्यातील वसुजळगाव येथे वीज पडून ऊसमजुराच्या बैलाचा मृत्यू झाला. इतर ठिकाणीही कमी-अधिक नुकसानीची नोंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. दोन-तीन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता. शिवाय ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.