‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:37+5:302021-05-16T04:19:37+5:30

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) ...

Hurricane 'Taiute' will cause strong winds in the district | ‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) व सोमवारी (दि.१७) जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा व झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

‘ताैउते’ चक्रीवादळ हे राज्याच्या किनारपट्टीने पुढे सरकत जाणार आहे. रविवारी सकाळी गोवा किनारपट्टीपासून हे वादळ पुढे सरकून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत धडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजेनंतर नगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दीड वाजेपर्यंत ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे काही प्रमाणात झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत, तसेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ मुंबई किनारपट्टीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. कोकण ते मुंबई किनारपट्टीदरम्यान हे वादळ असताना नगर जिल्ह्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई किनारपट्टीने हे वादळ पुढे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर वाऱ्याचा वेगही मंदावणार असल्याचे सांगण्यात आले.

..............

महावितरणची तयारी काय

जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असून, ग्रामीण भागात अनेक रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणला खबरदारीच्या उपाययोजनांबाबत काहीही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, ऐनवेळी सोसाट्याचा वारा वाढला, तर विद्युत पुरवठा खंडित करावा लागेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित केल्यास ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील व्यवस्था ठप्प पडू शकते.

.................

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर गेलेले असाल तर पाऊस व सोसाट्याचा वारा असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.

वीजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर बोलू नये, विद्युत उपकरणांपासून दूर थांबावे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणांचा आसरा घेऊ नये. पर्यटनस्थळी, नदी-नाले येथे जाऊ नये.

.............

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी जागरूक राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

Web Title: Hurricane 'Taiute' will cause strong winds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.