पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:46 IST2025-02-15T14:46:25+5:302025-02-15T14:46:51+5:30

शस्त्रक्रियेसाठी लागणारी मोठी रक्कम उभा करण्याचे आव्हान समोर ठाकले होते.

Husband brings Valentine back from the brink of death performs complex liver transplant surgery | पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली

पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली

आढळगाव : सध्या प्रेमीयुगुलांचे नाते बहरणारे वेगवेगळे 'डे' सुरू आहेत. मात्र, प्रेमाच्या दिखाव्यापेक्षा आपल्या 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारा जीवनसाथी मिळण्याचे भाग्य श्रीगोंद्यातील महिलेला लाभले. त्याचबरोबर तिच्या मातेनेही लेकीसाठी स्वतःचा मोलाचा तुकडा देऊन जीवदान मिळण्यास मदत केली.

मीना दिलीप गाडे (रा. मांडवगण रोड, श्रीगोंदा), असे त्या भाग्यवान महिलेचे नाव आहे. त्यांची यकृत प्रत्यारोपणाची किचकट आणि खर्चिक शस्त्रक्रिया करून पती दिलीप गाडे यांनी मोठ्या कष्टाने मृत्यूच्या दारातून परत आणले. तर, त्यांच्या आई संगीता कापरे यांनी स्वतःच्या यकृताचा तुकडा देऊन आपल्या काळजाचा तुकडा वाचवला.

मीना यांचा विवाह श्रीगोंद्यातील शेतकरी कुटुंबातील दिलीप गाडे यांच्याशी २०१३ मध्ये झाला. शेतीबरोबरच प्लम्बिंगचीही कामे दिलीप करतात. संसारवेलीवर वेदिका आणि कोमल या दोन कळ्या उमलल्या. संसार सुरळीत सुरू असताना, एप्रिल २०२४ मध्ये मीना यांना सुरुवातीला काविळीचे निदान झाले. तीन चार महिने ठिकठिकाणी उपचार घेतले. त्यादरम्यान गरजेनुसार विविध तपासण्या केल्या, तरीही फरक पडला नाही. मीना यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला नगरला उपचार घेतले. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटिलेटरवर पुणे येथे एका खासगी रुग्णालयात हलविले. पत्नीचा जीव वाचविण्यासाठी यकृत प्रत्यारोपण करावे लागेल. असे सांगितल्यानंतर दिलीप यांच्या पायाखालची वाळू सरकली. पत्नीच्या काळजीने झोप उडाली, परंतु मीना यांची आई संगीता यांच्या यकृताचा तुकडा वापरून शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते हा दिलासा मिळाला. परंतु, शस्त्रक्रियेसाठी लागणारी मोठी रक्कम उभा करण्याचे आव्हान समोर ठाकले.

पत्नीच्या काळजीबरोबरच मदत करणाऱ्यांच्या परतफेडीचे मोठे आव्हान उभे होते. मीना यांच्या नियमित तपासण्या सुरू असल्या, तरी त्या ठणठणीत असल्याचे समाधान दिलीप यांच्या चेहऱ्यावर दिसते. संकटात पाठीशी नव्हे, तर पुढे उभा राहणारा जीवनसाथी लाभला हेच प्रेम.


अनेकांचे मदतीचे हात..
दिलीप यांनी मदतीसाठी आवाहन केले. जीवलग मित्र परिवार, प्लम्बिंगच्या कामातून संबंध आलेल्यांसह नातेवाइकांनी मोठी मदत केली. ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, विजय निंभोरे यांनी श्रीगोंदा शहरात फेरी काढून मदत गोळा केली. मुख्यमंत्री सहायता निधीही मिळाला. मोठ्या कष्टाने आवश्यक रक्कम उभी करून ऑगस्ट महिन्यात शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर डोळे भरून आले.

Web Title: Husband brings Valentine back from the brink of death performs complex liver transplant surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.