अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 06:21 PM2018-10-16T18:21:34+5:302018-10-16T18:21:46+5:30

कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली.

'HVDS' scheme starts in Ahmednagar district: Ravindra Ukand from Nagar taluka gets first electricity connection | अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

अहमदनगर : कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ८ हजार ७०० शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार असून यासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोहोल्टचे स्वतंत्र रोहित्र या योजनेतून उभाण्यात येत आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढणे, आकडे टाकून वीजचोरीस वाव या बाबी टाळता येणार आहेत. योजनेतून उच्चदाब वाहिनीद्वारे थेट वीज पुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात घट व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होऊन पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.
आॅक्टोबर-२०११ मध्ये पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या रवींद्र उकांडे यांना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या हस्ते वीजजोडणी देण्यात आली. १६ किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रावरून साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला ही जोडणी देऊन जिल्यात योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी अहमदनगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, सहायक अभियंता केतन देवरे, सरपंच तुळसाबाई जगताप, उपसरपंच अंकुश नवसूपे, कैलास वाळके, युवराज नवसूपे, रवींद्र उकांडे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.

महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा दाबाने तसेच ठरलेल्या कालावधीत सलग वीज मिळू शकेल. रोहित्र व वीजपंप जळण्याच्या कटकटीतुन सुटका होईल. - रवींद्र राजाराम उकांडे, शेतकरी, मठपिंप्री

 

 

Web Title: 'HVDS' scheme starts in Ahmednagar district: Ravindra Ukand from Nagar taluka gets first electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.