हैदराबाद मुक्तिसंग्राम : लढवय्या स्त्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:33 PM2018-11-11T12:33:53+5:302018-11-11T12:34:19+5:30
ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामास (१९४२-२०१८) ७० वर्षे पूर्ण होत आहेत.
ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामास (१९४२-२०१८) ७० वर्षे पूर्ण होत आहेत. हा माझा जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा विषय आहे. कारण आमचे गाव सालेवडगाव (ता. आष्टी, जि. बीड) हे नगर - बीड सरहद्दीवरील शेवटचे गाव आहे. या संग्रामात सीमेवरील अनेक गावांना अन्याय, अत्याचारांच्या वेदना सोसाव्या लागल्या. या संग्रामात अनेक ग्रामीण स्त्रियांचे विशेष योगदान राहिले़ त्यांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
हैदराबाद मुक्तिसंग्राम धर्मनिरपेक्ष होता. उघड उघड कार्य करणारे काही स्वातंत्र्यसेनानी होते तर काही ‘भूमिगत’ राहून कार्य करणारे होते. त्याचा ज्वलंत इतिहास अलीकडे काही अभ्यासकांनी पुस्तकरुपाने प्रकाशित केला आहे. मी शालेय जीवनापासून त्याविषयी काही कथा ऐकल्या व नंतर वाचनही झाले.
हैदराबाद स्टेट काँग्रेसने हे आंदोलन उभारले. त्याला खंबीरपणे पंडीत नेहरु व सरदार पटेल यांचे सहाय्य व नियंत्रण होते. त्याची प्रेरणा स्वामी रामानंद तीर्थ (व्यंकटेश खेडगीकर - १९०३ - १९७२) यांच्यापासून घेतली. त्यांना ‘कर्मयोगी संन्यासी’ अशी उपमा लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथात दिली आहे़ हे चरित्र १९९९ साली प्रकाशित झाले आहे.
या जनआंदोलनात महिला मेळावे, महिला परिषदा घेऊन स्त्रियांमध्ये जागृती झाली. साध्या ग्रामीण स्त्रियांनी यात हिरीरीने भाग घेतला. ‘भूमिगत स्वातंत्र्य सेनानींना’ स्त्रियांनी रात्री अपरात्री भाकर तुकडा पोहोचविला. ज्यांची काही नावे इतिहासाला अज्ञात आहेत़ तसेच सत्याग्रहात स्त्रिया धाडसाने सहभागी झाल्या. अशा स्त्रियांकडे ग्रामीण शहाणपण होते. निजामाचं (अन्सारी राजवट) तळपट होत आहे, हे त्यांनी जाणून घेतले होते.
ईट (ता. भूम) येथील वीर महिला गोदावरी किसनराव टेके यांचे नाव प्रथम घेता येईल. किसनराव बंदूक घेऊनच वावरत व दरारा दावत. एकदा त्यांच्याकडे बंदूक नव्हती. अशा संकटात रझाकारांच्या (खाकसार-इत्तेहादूल मुसलमीन संघटना व कासीम रझवी हा त्याचा प्रमुख होता व सुमारे दोन लाख रझाकारांची ही सेना होती.) गोळीबारात किसनरावांना हुतात्म्य आले़ पत्नी गोदावरी सूडाने पेटली. बोलल्या ‘नवऱ्याच्या हत्येचा बदला घेईन, तरच खरी मालकीण!’ त्या बंदूक चालवायला शिकल्या होत्या. त्यांचा मुलगा माधवराव कँपवर (हे निजामविरोधी कँपस् जिल्ह्याच्या सीमेवर असत.) लढत होता. बार्इंनी घरात कोंडून घेतले. बंदूक उचलली. बार्इंनी खिडकीतून गोळीबार सुरू केला. एक रझाकार मारला़ रझाकारात खळबळ माजली आणि रझाकार चेकाळले़ त्यांनी घरच पेटून दिले़ गोदावरीबार्इंचा त्यात अंत झाला़ त्या हुतात्मा झाल्या.
तुळजापूरकडील नांदगावच्या सांबाबाई बीरा धनगर, पुंजाबाई पुंजाजी बुजुर्गे (ता. जाफराबाद), औरंगाबादकडील कोंडलवाडीच्या बाळूबाई गंगुलाल, नांदेडच्या लक्ष्मीबाई बाळाजी मयेकर, नागव्वाबाई अंबेसंगे या वीर स्त्रिया रझाकारांच्या गोळीबारात हुतात्मा झाल्या!
सिल्लोड तालुक्यातील रुक्मिणीबाई कोरडे यांनी (१९४०-४१) जंगलतोड वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवास (६ महिने व ८ महिने) भोगला़ नंतर सुटका झाल्यावरही ‘भूमिगत’ राहून कार्य केले. वाईच्या गीताबाई चारठाणकर यांना शस्त्रे आणताना अटक झाली व नंतर सुटल्यावर ‘भूमिगत’ राहून कार्य केले़ अशा या धडाडीच्या विरांगणा!
शेळगी येथील त्रिवेणीबाई पाटलीण या चळवळीच्या जाण असलेल्या कार्यकर्त्या होत्या. त्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करीत. त्यांच्या उदारपणामुळे कार्यकर्ते थक्क झाले़ त्या म्हणत, ‘‘मला बी एक रायफल द्या. तुमच्याबरोबर लढता लढता मरेन बरे! कारण रझाकार माझी अब्रू लुटतील़’ त्या काळी त्रिवेणीबाईबद्दल बोलले जायचे, ‘‘पाटलीण बिजलीवानी दिसायची, यात बार्इंचे चमकदार व्यक्तिमत्त्व होते़
उमरगा तालुक्यातील गुंगोटी येथील सोनूबाई पाटलीण एक सुंदर स्त्री होती. तिला एक जमादार सतत त्रास देत होता. त्यामुळे एका कार्यकर्त्याने तिला एक ‘युक्ती’ सुचविली. एक दिवस आडावर ती पाणी भरीत होती. जमादार तेथे पटकलाच़ बार्इंनी त्याला पाहून लाजून मुरका मारला़ जमादार खूश़ त्याला वाटले बाई आपल्या हातात आली. बार्इंनी सांगितले, ‘अमूक जागी जोंधळ्याच्या पिकात संध्याकाळी या. मी तेथेच आहेच़’ जमादार घाईनेच उतावीळपणे गेला़ जोंधळ्यात जमादाराने जवळ येऊन तिचा हात धरताच बाजूने ४-५ तरुण कार्यकर्ते उठले़ जमादारावर सपासप शस्त्राने वार केले़ सोनूबाईनेही त्याच्यावर कोयत्याने वार केले़ जमादार यमदरबारी गेला़ फेब्रुवारी १९४८ मधील ‘गनिमी काव्याची’ ही थरारक घटना़
मर्दानी दगडाबाई शेळके हिची कहाणी तर अद्भूत वाटावी. त्या जालन्याकडील धोपटेश्वराच्या. जन्मगाव कोलते टाकळी. त्यांचे आदर्श होते - छत्रपती शिवराय, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमाता अहिल्याबाई होळकर! त्यांनी भिल्लांकडून शस्त्रांचे शिक्षण घेतले. रझाकारांना त्यांनी चांगलाच शह दिला. होमगार्ड ट्रेनिंग, झेंडा व जंगल सत्याग्रहात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. कोलते टाकळीच्या शिवारात एकदा त्यांनी हातगोळा टाकून निजामाचा आख्खा कँपच उद्ध्वस्त केला! त्या अपंग मुलाला पाठीशी बांधून लढ्यात उतरत. एका हातात
बंदूक व दुसºया हातात घोड्याचा लगाम धरीत. या लढ्यात त्यांना तुरुंगवासही सोसवा लागला.
शर्ट- पँट असा त्या पुरुषांसारखा वेष घालीत व नेहमी घोड्यावरून दौड असे. पण नंतर कुटुंबाकडून अशा वीरश्रीला विरोध होऊ लागला. त्यांनी मग अजब निर्णय घेतला़ नवरा देवरावही रागाऊ लागला़ दगडाबार्इंनी स्वत:च्या जिवाचं बरं-वाईट व्हईल, म्हणून मैनाबाई हिच्याशी नवºयाच्या पसंतीने लग्न लाऊन दिले! त्यांची ही कृती त्या काळात अद्भूत व धाडसी - निर्भय होती. अशी ही देशभक्ती व अन्यायाविरुद्धची चीड! निजामाची राजवट - ती विषवल्ली खल्लास केलीच पाहिजे, हे त्यांचे ध्येय होते! लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष केले. अहो, जिवंतपणीच त्या दंतकथेचा विषय झाल्या! त्यांच्या लढाऊपणावर पुस्तकच होऊ शकते! एवढी अफलातून त्यांची कामगिरी आहे. त्या वयाच्या सुमारे ९८ व्या वर्षी (२०१३) दिवंगत झाल्या. धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथे सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले़ शेतकरी नेते शरद जोशींनी त्यांची दखल घेत व चांदवडच्या ‘शेतकरी महिला मेळाव्याचे’ अध्यक्षपद त्यांना दिले होते.
याशिवाय काही महिलांचे ‘गट’ या संग्रामात कार्यरत (१९४७) होते, असे वाचावायास मिळते! त्यांची काही नावे अशी - लता बोधनकर, बकुळा पेडगावकर, सीताबाई विनायक चारठाणकर (त्यांचे पती विनायकराव देखील संग्रामात सहभागी होते.), प्रतिभा वैशंपायन, कमला देशपांडे, सुशीला दिवाण, आशाताई वाघमारे, लेखक - पत्रकार अनंत भालेरावांची पत्नी सुशीला, लेखक बी. रघुनाथांच्या पत्नी कॉ. करुणा चौधरी, डॉ. तारा परांजपे, सुनंदा जोशी, विमल मेलकोटे (हैद्राबाद), सुमित्रा वाघमारे, गंगूबाई देव, संगम लक्ष्मीबाई, (तेलगू) याशिवायही काही अज्ञात स्त्रियांची (सामुदायिक घटना, जाळपोळ, मोर्चे इ.) नावे इतिहासात नसतील. संशोधन प्रक्रिया अखंड चालू असते! म्हणून मी नम्रपणे म्हणेन - ज्ञात - अज्ञात अशा शूरवीर महिलांच्या स्मृतीला वंदन! आणि ओठावर शब्द येतात - ‘‘भयचकित नमावे तुज रमणी!’’
डॉ. भि. ना. दहातोंडे (लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रतिष्ठानचे सचिव इतिहासाचे अभ्यासक आहेत़)