मी विकासाचा दहशतवादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:21+5:302021-01-22T04:19:21+5:30
जामखेड : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या बाजूने कौल मिळाला आहे. गेल्या ...
जामखेड : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या बाजूने कौल मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत आपण या मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली आहे. त्याची राज्यभर चर्चा आहे. जे कोणी स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेत असतील त्यांनी त्याचे विश्लेषण करावे. मात्र, दबाव आणि दडपशाहीचे राजकारण फार काळ टिकत नाही, अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.
चोंडी (ता. जामखेड) येथे कर्जत- जामखेड मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, प्रवीण चोरडिया, लहू शिंदे, जालिंदर चव्हाण, सोमनाथ राळेभात, डॉ. अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, वर्षभरात जामखेड तालुक्यात कसलेही विकासाचे काम झाले नाही. सीआरएफ फंडातून विंचरणा नदीचेे काम चालू आहे. त्यासाठी जेसीबी, पोकलेन व डिझेल बारामतीमधून आणले जात आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत सर्व हिशोब चुकता करू, असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, ८० टक्के ग्रामपंचायती जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा पूर्णपणे खोटा आहे. या तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील २३ ग्रामपंचायती निर्विवादपणे भाजपच्या ताब्यात आल्या आहेत, तसेच १० ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यापैकी चार भाजपच्या आहेत. १० ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे, असे त्यांनी सांगितले.