अजूनही मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, पाणी पाटामध्ये येते, याचाच आनंद - बाळासाहेब थोरात
By शेखर पानसरे | Published: May 31, 2023 07:36 AM2023-05-31T07:36:14+5:302023-05-31T07:36:39+5:30
पावसाळा तोंडावर आला असताना भंडारदरा आणि निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : मी आमदार आहे. माझ्या कार्यक्षेत्रात आणि मतदारसंघात निळवंडे धरणाचे पाणी दिले जाते आहे. परंतु अजूनही मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे संकेताला सोडून आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. जे काम आम्ही वर्षानुवर्ष करत होतो. जी मेहनत आम्ही करत होतो. त्याकरिता सातत्याने प्रयत्न करत होतो. ते पाणी पाटामध्ये येत आहे. याचाच आनंद आम्हाला आहे. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी ( दि.३१) निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. त्या संदर्भाने मंगळवारी ( दि.३०) आमदार थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, निळवंडे धरण कसे झाले, त्याकरिता कुणी प्रयत्न केले. हे सर्वांना माहीत आहे. हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पावसाळा तोंडावर आला असताना भंडारदरा आणि निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी शिल्लक आहे. अशावेळी ते पाणी सोडले जात नव्हते. पुढील वर्षी दुष्काळाचा धोका सांगितला जात असून हे पाणी दुष्काळी भागाला मिळण्याकरिता मी आग्रह धरला. त्यांनी मान्य केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. चाचणी करिता का होईना, पाणी सोडले जाते आहे. त्याचा आनंद मला आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी निळवंडे धरण व्हावे, म्हणून आग्रह धरला होता. आंदोलने केली होती. परिषदा, उपोषाने केली. शेवटी त्याचे फळ मिळते आहे आणि उद्या पाणी सोडले जाते आहे. हा चांगला योग आहे. आता त्यांच्या हस्ते पाणी सोडले जाते आहे. याचे वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही. शेवटी पाणी सोडले जाते आहे, याचाच आनंद मी मानतोय. भाषणामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. होऊ द्या तो प्रयत्न, त्याने काही फरक पडतो. असे मला काही वाटत नाही, असे थोरात म्हणाले.