"अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले"
By शेखर पानसरे | Published: January 3, 2024 11:10 PM2024-01-03T23:10:21+5:302024-01-03T23:10:59+5:30
छगन भुजबळ : संगमनेरात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उदघाटन
संगमनेर : मराठा समाजाशी आमचे वैमनस्य किंवा दुश्मनी नाही. मी सुद्धा ३१ वर्ष शरद पवार व आता अजित पवार यांच्या सोबत काम करतोय. माझ्या मनात राग किंवा विष असते तर कधीच त्यांच्याबरोबर काम केले नसते. त्यांच्याबरोबर राहून अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान मी केले. असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
बुधवारी (दि.०३) संगमनेर शहरातील जय जवान चौकात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सकल ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे ५८ मोर्चे शांततेत निघाले. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, याला माझा सुद्धा पाठिंबा होता. उच्च न्यायालयात ते टिकले. मात्र सुप्रीम कोर्टात अडकले. त्या त्रुटी दूर करून आरक्षण द्या. तुमचे ताट वेगळे आणि आमचे ताट वेगळं चालू द्या. आम्ही आजही मराठा समाजाला मोठा भाऊ समजतो. परंतु जालन्यातून नवीन नेते जे तयार झाले आहेत. प्रत्येक वेळी त्यांची मागणी बदलत चालली आहे. आमचा विरोध फक्त ओबीसीतून आरक्षण देण्याचा आहे. हे भलते सलते लाड महाराष्ट्रात चालणार नाही. हा ओबीसी कुठल्याही दादागिरीला घाबरत नाही. नुकतेच अधिवेशन झाले. ओबीसींचे आमदार सुध्दा बोलायला तयार नाही आणि जे बोलतात ते माझ्याच विरुद्ध बोलत आहेत. मराठा समाजाला भरपूर काही मिळाले आहे. आज अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत. आतापर्यंत ८० टक्के मुख्यमंत्री तुमचेच झालेत. आम्ही तुम्हाला मोठ भाऊ मानतो. मात्र, आम्हालाच संपवायला लागले तर हे संपणार नाही, हे लक्षात ठेवा. असेही मंत्री भुजबळ म्हणाले.