माझी शाळा माझे झाड उपक्रम राबवण्याची गरज : अभिनेते सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 06:48 PM2019-06-04T18:48:48+5:302019-06-04T18:48:57+5:30
प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे.
केडगाव : प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे. निसर्ग, वृक्ष नसतील तर मानवाला अन्न-पाणी काहीच मिळाणार नाही. ट्री स्टोरी फाऊंडेशन माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी, त्यासाठी वातावरण निर्मितीसाठी झाडांचे वाढदिवस, वृक्ष महोत्सव यासारखे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पर्यावरण स्नेही संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ट्री स्टोरी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यातील नगरसह औरंगाबाद, नाशिक, सातारा, धुळे, बीड यासह 19 ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ हाती घेतलेली आहे. एक एकर मध्ये 400 झाडांची रोपटी लावून देवराई प्रकल्प उभारणार आहे. यासाठी किमान एक एकर ते त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात झाडे लावणार आहे. यामध्ये वेली, वेली, झुडपे, जंगली झाडे, तसेच वड, पिंपळ, लिंब यासारखी मोठी झाडे, फळझाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील मोकळ्या जागा तसेच सरकारी क्षेत्रातील वन विभाग, गायरान क्षेत्रातील जागांवर झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सयाजी शिंदे म्हणाले, की शहरी भागातील लोक उपदेशाचे डोस पाजतात. त्यांच्याकडून प्रत्यक्षात कृती होत नाही, याउलट ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेमध्ये प्रेम, आपुलकी, सहकायार्ची भावना आहे. ते प्रत्यक्ष कृती तरी करतात. त्यामुळे यापुढील भागात काळात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेतले जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची सक्ती केली तरी वृक्षसंवर्धनच्या चळवळीला त्याचा मोठा फायदा होईल. माझी शाळा, माझ्या शाळेतील एक झाड याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या नावाने झाड लावण्यासाठी त्यांना प्रेरित केले जाणार आहे. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या गावात झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तर त्यांना फार मोठी प्रतिष्ठा मिळू शकते. यापुढील काळात जो झाडे लावील तो प्रतिष्ठित अशी व्याख्या नव्याने तयार करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीमध्ये मविचारी माणसे जोडली जाणार आहेत. यावेळी अमोल जाधव उपस्थित होते.