‘तनपुरे’ कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचे सिध्द केल्यास खासदारकीचा राजीनामा देईन; सुजय विखे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:34 AM2020-10-28T11:34:07+5:302020-10-28T11:34:49+5:30
तनपुरे साखर कारखान्याची मिल, भंगार, जमिन विक्री केली. त्याचे पैसे कामगारांच्या वेतनासाठी दिले. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले तर खासदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
राहुरी : तनपुरे साखर कारखान्याची मिल, भंगार, जमिन विक्री केली. त्याचे पैसे कामगारांच्या वेतनासाठी दिले. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले तर खासदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. मंगळवारी (दि.२७) डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा खासदार डॉ. विखे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी रावसाहेब साबळे होते. महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, संचालक श्यामराव निमसे, सुरेश करपे, तान्हाजी धसाळ, अमोल भनगडे, साहेबराव म्हसे, उत्तम म्हसे, चाचा तनपुरे, शिवाजी सोनवणे, ज्ञानदेव आहेर उपस्थित होते.
विखे म्हणाले, परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक लढविली. सभासद, कामगारांनी विश्वास टाकला. जिल्हा बँकेत माजी आमदार कर्डिले यांनी मदत केली. त्यामुळे कारखाना सुरळीत चालविता आला. ज्यांनी परिवर्तन मंडळाच्या काळात एक टिपरु ऊस कारखान्याला दिला नाही, कारखान्यातून घेतलेले जुने ॲडव्हान्स भरले नाहीत, त्यांना कारखान्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आसवणी प्रकल्प भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न करु. शक्य झाले नाही तर, देशी दारुचे लायसेन्स विकू. पण दीड महिन्यात आसवणी सुरु करु. कारखाना तीनदा विक्रीला काढला.
आधुनिकीकरण करुन, मशिनरी सोन्यासारखी केली. तीन हजार टनी कारखाना चार हजार दोनशे टनी केला. मागील निवडणुकीत जेवढे सभासद होते. तेवढेच राहतील. कब्जा करण्यासाठी मतदार यादीतून नावे कमी करणार नाही. कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखे माझे जीवन शेतकरी, कामगारांना समर्पित राहील. परिवर्तन मंडळाच्या काळातील कामगारांची थकबाकी जानेवारी महिन्यापासून देण्यास सुरुवात करु. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा व ऊसदर मिळेल याची खात्री बाळगा, असेही विखे म्हणाले.