आयकॉन पब्लिक स्कूलने अडविला जिल्हाधिका-यांचा ताफा : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:40 AM2018-11-29T10:40:32+5:302018-11-29T10:40:34+5:30
महापालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये जागेची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये जागेची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व त्यांच्यासोबत असलेल्या अधिका-यांना प्रवेशद्वारावरच अडवून अरेरावी करण्यात आल्याची धक्कादायक बाब घडली़ बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आयकॉन पब्लिक स्कूलचा डायरेक्टर राणा (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुुरू आहे. सुविधायुक्त व जवळच्या शाळांमध्ये मतदान केंद्र उपलब्ध होईल का याची सध्या पाहणी सुरू आहे. बुधवारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यासह उपायुक्त प्रदिप पठारे, प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता गोविंद बल्लाळ हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनरोडवरील मल्हार चौक परिसरात असलेल्या आयकॉन पब्लिक स्कूल येथे गेले. प्रवेशद्वारावर अधिका-यांनी सुरक्षा रक्षकांना जिल्हाधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी आले असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी शाळेत जात असताना तेथे उपस्थित असलेल्या राणा नावाच्या व्यक्तीने अधिकाºयांना अडविले.
निवडणूक कामासाठी आलो असल्याचे अधिका-यांनी राणा याला सांगितले तरी त्याने ‘परवानगी न घेता तुम्ही शाळेच्या आवारात कसा प्रवेश केला’ असे म्हणून हुज्जत घालत थेट जिल्हाधिकारी यांच्यासह अधिका-यांना अरेरावी केली. तसेच शाळेच्या खोल्या पाहण्यासही मज्जाव केला़ या प्रकारानंतर जिल्हाधिकारी व त्यांचे पथक शाळेची पाहणी न करताच परतले़ पोलिसांनी राणा याच्या विरोधात कलम १८६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.