शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल

By Admin | Published: September 4, 2014 11:08 PM2014-09-04T23:08:31+5:302023-04-29T17:31:11+5:30

अहमदनगर : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित ग्रामीण भागात दर्जेदार प्राथमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांतून सुरू आहे.

The 'Ideal' way of school for the persistence of the teachers | शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल

शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल

अहमदनगर : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित ग्रामीण भागात दर्जेदार प्राथमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांतून सुरू आहे. या शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्ती, आकलन शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदर्श शाळा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी शिक्षक परिश्रम घेत आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सुरू असल्याने या शाळा समाजासाठी दीपस्तंभ ठरल्या आहेत.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा जिल्हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. जिल्ह्यात १४ तालुक्यात १२ हजार प्राथमिक शिक्षक असून त्यातून प्रत्येक तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले काम करण्याऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्याचे दिव्य जिल्हा परिषदेला पार पाडावे लागते. खासगी शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, असे वाटत आहे. यातून खासगी शाळांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा शाळेचा पट कमी होऊन त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहेत.
या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यासोबत खासगी शाळांकडे जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षकांसामोर आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दर्जेदार प्राथमिक शाळा असून त्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या शाळेतील शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आढावा घेण्यात आला आहे. या शाळामध्ये खासगी शाळांच्या तुलनेत भौतिक साधनाचा अभाव असला तरी त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागाचा वापर करून आवश्यक साधन सामुग्री जमा करण्यात येत आहे. यातून डिजिटल स्कूल, ई लायब्ररी, संस्कार शिबिरे, फिरते गं्रथालय हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
तरंगे वस्ती शाळा
संगमनेर तालुक्यातील ही शाळा व्दि शिक्षकीय आहे. सुदाम दाते हे शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. या शाळेला गुणवत्ता विकासाचा तालुका आणि जिल्हास्तरावरील, ग्रामीण भागातील आदर्श शाळेच्या पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळालेले आहेत. शाळेला स्वच्छ सुंदर शाळा, ‘अ’ मूल्यांक न श्रेणी, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शालेय बाबींचे प्रसारण, संगणक लॅब, प्रिंटर शाळेत उपलब्ध, शालेय भौतिक, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दरमहा तीन हजार रुपयांचे शिक्षकांचे योगदान. शाळेत फिरते गं्रथालय, डिजीटल वर्ग खोल्या, नावीन्यपूर्ण वर्ग सजावट, ई लर्निंगव्दारे अध्ययन,अध्यापन, संस्कार शिबिराचे आयोजन, वर्गातील बैठक व्यवस्थेसाठी कॉन्फरन्स प्रकारचे फर्निचर आदी. लोकसहभागातून लाखो रुपयांचे साहित्य, फिरोदिया फाऊंडेशनकडून चाईल्ड फ्रेंडली ईलीमेंटस्साठी दीड लाखांची मदत मिळविली. शाळेच्या मैदानावर लोकसहभागातून शंभर ट्रॉली मुरूम टाकून घेतला.
जिल्हा परिषद शाळा नेप्ती
नगर तालुक्यातील ही बहुशिक्षकी शाळा असून या ठिकाणी मीना जाधव या शिक्षिका कार्यरत आहेत. शाळेला ग्रामीण भागातील आदर्श शाळेचा पुरस्कार मिळालेला आहे. मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी आहे. शाळेत एलसीडी प्रोजेक्टर असून गीत मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. शाळा डिजीटल असून या ठिकाणी ई लायब्ररी आहे. शाळेत प्रश्न मंजूषा, बाल आनंद मेळावा, संस्कार शिबिरे, योगासन, सूर्य नमस्कार शिबिर, मानवी मनोरे आणि हस्ताक्षर सुधार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून शाळेत फर्निचर, संगणक, सौर ऊर्जेचे दिवे, साऊंड सिस्टीम मिळविण्यात आली आहे. हे साहित्य साधारण पाच लाख रुपये किमतीचे आहे.
शिंगवे तुकाईची
प्राथमिक शाळा
नेवासा ही शाळा बहुशिक्षकी आहे. परिसर स्वच्छ आणि सुंदर, वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम राबविणारी शाळा, ई लर्निंग, सुंदर हस्ताक्षर उपक्रम, तारखेनुसार पाढे वाचन, पालक डिक्शनरी उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे. या शाळेतील शिक्षक गोकुळ झावरे यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी लोकसहभागातून संगणक, एलसीडी, प्रिंटर यासह अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. ही शाळा तालुक्यात नावाजलेली शाळा आहे.
जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे शुक्रवारी (आज) वितरण होणार आहे. हा कार्यक्रम शेंडी येथील एका सांस्कृतिक भवनात पार पडणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
शाळेतील उपक्रम
यंदापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून सुंदर माझी शाळा, चला जाऊया आपल्या शाळेला, माझे गाव-माझी शाळा, शाळा माझी आवडीची, सप्तरंगी परिपाठ, इंग्लिश डे, सेमी शाळा, वर्ग माझा पहिला, अध्ययन स्तर निश्चिती, वाचन संस्कृती, प्रश्नमंजूषा, शिवार फेरी, बालआनंद मेळावा, कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, क्षेत्र भेट, शाळा तेथे प्रयोग शाळा, माजी विद्यार्थी मेळावा, स्नेहसंमेलन उपक्रम सुरू आहेत.

Web Title: The 'Ideal' way of school for the persistence of the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.