काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफीची हमी घेऊ : राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 07:48 PM2019-02-12T19:48:29+5:302019-02-12T19:49:11+5:30
राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
लोणी : राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दाढ बुद्रुक येथे सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून मंजूर झालेल्या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कैलासराव तांबे, प्रतापराव तांबे, देवीचंद तांबे, अशोक गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, दिनेश बर्डे, नंदाताई तांबे, पूनम तांबे, श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्हाद बनसोडे, विजय तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ता कोणाचीही असो विकास कामांमध्ये आपण कुठेही कमी पडत नाही. सध्याच्या सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. २०१४ साली त्यांच्या भुलथापांना मतदार बळी पडले. सत्तेवर येताच आम्ही सातबारा कोरा करु म्हणणारे सत्तेवर येताच बदलले. काँग्रेस पक्षाने राज्यात जनसंघर्ष यात्रा काढली. याचा दबाव राज्य सरकारवर आल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. पण ही कर्जमाफी जाचक नियम आणि अटींमध्ये अडकविली. त्यांच्या कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही. त्यामुळे या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही.
मोदी सरकार देशात दोन कोटी युवकांना नोकºया देणार होते. मात्र यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. वाढत्या बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक या निमित्ताने समोर आला. वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात संघटीतपणे आता मुकाबला करावा लागेल. या सरकारच्या कोणत्याही धोरणांचा लाभ सामान्य माणसाला झालेला नाही. या सरकारच्या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्याला न्याय मिळवावा लागेल असे त्यांनी विखे म्हणाले.