मृत्युदर वाढला तर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:09+5:302021-03-25T04:20:09+5:30
राहुरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रसार आपल्याला रोखावा लागेल. त्यावर उपयायोजना करण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारच्या ...
राहुरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रसार आपल्याला रोखावा लागेल. त्यावर उपयायोजना करण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. कोरोनाचा मृत्युदर असाच कायम राहिला तर आपणास जबाबदार धरण्यात येईल. आपणावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक कृषी विद्यापीठात पार पडली. यावेळी विविध खात्यांतील अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले. उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले पुढे म्हणाले, जे नागरिक होम आयसोलेशनमध्ये आहेत. ते गर्दीच्या ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. तालुक्याचा दर राज्यात दीड ते पावणे दोन पटीने वाढत आहे. यापुढे आपण कर्तव्यात कसूर केल्यास आपल्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी डॉ. संजीव सांगळे, दयानंद जगताप, प्रांताधिकारी अनिल पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, अण्णासाहेब मासाळ, नलिनी विखे, गोविंद खामकर, गणेश तळेकर, गणेश आठभाई, वृषाली कोरडे, अविनाश जाधव, मल्हारी कौतुके आदींसह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...
२४राहुरी बैठक
..
राहुरी येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरोनाविषयी अधिकाऱ्यांना सूचना करताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले.
...