ज्ञानसंपादनाची प्रेरणा गुलामाची असेल तर भाषा समृद्ध कशी होणार? - नारायण सुमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:50 PM2018-02-27T17:50:24+5:302018-02-27T17:51:33+5:30
इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.
अहमदनगर : इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात सुमंत बोलत होते.
नारायण सुमंत म्हणाले, जगण्याला जे प्रेरणा देते ते ज्ञान व तंत्रज्ञान आपण शिकत नाही. त्यामुळे अनेक समस्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थी वर्गापासून ते शिक्षणापर्यंत अनेक विषय मातृभाषेतून आपणाला मांडता येतात. कवितेच्या माध्यमातून मराठी शब्दातून राजकीय, सामाजिक विषयावरील विडंबने व वात्रटिका प्रभावीपणे करता येतात, असेही ते म्हणाले.
कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे होते. प्रास्तविक डॉ.सुनीता भांगे पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. आभार डॉ.नवनाथ येठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.निलेश लंगोटे व प्रा.स्वाती चौधरी यांनी परिश्रम घेतले.