पगार लेट झाल्यास अधिकाऱ्यांना भुर्दंड
By Admin | Published: May 2, 2016 11:21 PM2016-05-02T23:21:28+5:302016-05-02T23:32:15+5:30
अहमदनगर : रोजगार हमी योजनेत कामाचे मस्टर पूर्ण झाल्यावर मजुरांचे पगार लेट झाल्यास संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.
रोजगार हमी : पगार वेळेत करण्यात नगर राज्यात पाचव्या स्थानावर
अहमदनगर : रोजगार हमी योजनेत कामाचे मस्टर पूर्ण झाल्यावर मजुरांचे पगार लेट झाल्यास संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. हा दंड संबंधीतांना त्यांच्या खिशातून भरावा लागणार असून नगर वेळेत पगार करणाऱ्या जिल्ह्यात राज्यात पाचव्या स्थानावर आहे.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत हद्दीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रोहयोचे नियंत्रण करण्यात येत आहे. रोहयोचे काम आणि मस्टर पूर्ण झाल्यावर १५ दिवसांच्या आत संबंधीत कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बँक अथवा त्यांच्या पोस्टाच्या खात्यावर टाकणे बंधनकारक आहे. त्यात उशीर झाल्यास दरहजारी पाचप्रमाणे संबंधीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. हा दंड संबंधीतांच्या पगारातून वसूल होणार आहे.
राज्यात रोहयोचा पगार वेळेत करणाऱ्या जिल्हा परिषदेत नगर जिल्हा परिषद राज्यात पाचव्या स्थानावर आहे. नगरमध्ये ५९.५ टक्के रोहयो मजुरांचे पगार वेळेत होत असून ४० टक्के मजुरांच्या पगारास विलंब होत आहे. राज्यात सातारा पहिल्या क्र मांकावर असून दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर, त्यानंतर नागपूर आणि नाशिक आहे. नगरनंतर पुणे जिल्हा परिषदेचा नंंबर आहे. सर्वाधिक वाईट स्थिती परभणी जिल्ह्याची आहे. या ठिकाणी वर्षभरात अवघा ४. ८५ टक्के खर्च झाला असून औरंगाबाद जिल्ह्यात १५. ११ टक्के तर, बीड जिल्ह्याचा खर्च १५.११ टक्के झाला आहे. (प्रतिनिधी)
मजुरीच्या दरात वाढ
जिल्ह्यात सर्वाधिक वाईट स्थिती जामखेड आणि कोपरगाव तालुक्यातील आहे. या ठिकाणी ३७ टक्के आणि ३८ टक्के मजुरांचा पगार होत आहे. यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी दंडाला पात्र ठरत आहेत. सर्वाधिक वेळेत पगार राहाता तालुक्यात ८९ तर श्रीरामपुरात ७३ आणि श्रीगोंद्यात ७२ टक्के होत आहेत. गेल्या वर्षी रोहयोची मजुरी १८१ रुपये होती तर आता त्यात वाढ होत १९२ रुपये झालेली आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रोहयोत ६२९ गावात ६ हजार १६३ मजूर कामावर आहे. महसूलमार्फत राबवण्यात येणाऱ्या रोहयोची ८६० कामे सुरू असून त्या ठिकाणी ८ हजार ६४६ मजूर उपस्थित आहेत. दोन्ही विभाग मिळून १ हजार ४८९ कामावर १४ हजार ८०९ मजुरांची उपस्थिती आहे.