खर्चात तफावत आढळली तर उमेदवार अपात्र : सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:05 PM2018-11-30T17:05:42+5:302018-11-30T17:08:23+5:30

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या पथकांनी आणि खर्चनियंत्रण पथकांनी उमेदवारांकडून येत असलेल्या माहितीची खातरजमा करावी.

If there is a discrepancy in the cost, the candidate is ineligible: Saharia | खर्चात तफावत आढळली तर उमेदवार अपात्र : सहारिया

खर्चात तफावत आढळली तर उमेदवार अपात्र : सहारिया

अहमदनगर : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या पथकांनी आणि खर्चनियंत्रण पथकांनी उमेदवारांकडून येत असलेल्या माहितीची खातरजमा करावी. सोशल मीडियावरील प्रचारावरही यंत्रणेचा वॉच असेल. उमेदवारांनी दैनंदिन खर्च ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’द्वारेच सादर करावा. तो तसा केला नाही किंवा मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे सिद्ध झाले तर उमेदवार अपात्र होईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिला.
महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सहारिया शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणूक अधिकाºयांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी केली असून अधिकाधिक मतदान होण्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांच्या नावाबाबत खातरजमा करण्यासाठी आणि उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची माहिती भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केले आहे. उमेदवारांना त्यावरच त्यांचा निवडणूक खर्च भरुन देणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर उमेदवार अपात्र करू, असा इशाराच त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव झेंडे, निवडणूक निरीक्षक नंदकुमार बेडसे, लक्ष्मण राऊत यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.
एकूण प्रभाग, मतदानकेंद्रांची संख्या, आदर्श मतदान केंद्रे उभारण्यासाठीची झालेली कार्यवाही, रात्रीची गस्त, संशयास्पद बँक व्यवहारांवर लक्ष आणि त्यावर कार्यवाही, दारुविक्री आणि विनापरवाना दारु दुकाने उघडी राहण्याच्या घटनांबाबत दक्ष राहण्याच्या आणि अशा प्रकारांवर कडक कार्यवाहीच्या सूचना सहारिया यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
निवडणूक कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीत कोणताही अनुचित प्रकार सुरु असेल, तर जागरुक नागरिक, स्वयंसेवी संस्था त्याची माहिती कॉप (सिटीझन आॅन पॅट्रोल) या अ‍ॅपवर देऊ शकतात. तात्काळ ती माहिती त्या प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडे जाऊन संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राबाबतची माहिती संबंधित प्रभागातील नागरिकांना कळावी, यासाठी ती ठिकठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अवैध आणि संशयास्पदरित्या पैशांची वाहतूक, व्यवहार यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयकर आणि विक्रीकर अधिकाºयांवर आहे. त्यांनी व्यापक प्रमाणात ही मोहीम हाती घ्यावी. कोणत्याही प्रकारे असे व्यवहार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आणि खासकरुन शहरातील बँका, पतसंस्था, सहकारी संस्थांतील व्यवहारांवर लक्ष ठेवावे. मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या कोणत्याही घटनांवर तात्काळ कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
सोशल मीडियावरील प्रचारावर पोलिसांच्या सायबर क्राईम बँ्रचची नजर असेल. एखादा संदेश कोठून तयार झाला व तो कोणी प्रसारित केला, किती ग्रुपवर, किती सोशल साईटवर गेला याचा हिशोब ठेवून तोही खर्चात धरला जाईल, असेही यावेळी अधिकाºयांनी स्पष्ट केले.

४१ केंद्र अतिसंवेदनशील
मनपा निवडणुकीसाठी २ लाख ५६ हजार ७१९ मतदार आहेत. एकूण ३३७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यातील १३४ केंद्रे संवेदनशील, तर ४१ केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. ६ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २ हजार कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहणार असून, निवडणुकीसाठी २ हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.

दानवेंविरूद्धच्या तक्रारीची दखल
आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी पथकाकडे दाखल झाल्या आहेत. त्या सर्वांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरूद्ध दाखल आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, या पत्रकारांच्या प्रश्नावर सहारिया यांनी सांगितले की, मनपा आयुक्तांनी तक्रारींचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवावा, त्याची शहानिशा करून नियमाप्रमाणे कारवाई करू.

Web Title: If there is a discrepancy in the cost, the candidate is ineligible: Saharia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.