कामाला दैवत मानले तर यशाची दारे उघडतातच, अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:06 PM2021-03-02T12:06:37+5:302021-03-02T12:08:06+5:30
फिल्मी दुनियेत मोठी स्पर्धा आहे. काम मिळविण्यासाठी संघर्ष अटळ आहे. अशा परिस्थितीत मिळालेल्या कामाला दैवत मानले पाहिजे. कोणतेही काम निष्ठेने व जबाबदारीने केले तर तुम्हांला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
योगेश गुंड
विशेष मुलाखत
अहमदनगर : नगरच्या मातीत तयार होत असलेली ‘तुझं माझं जमतयं’ या मालिकेचे शंभर भाग झाले असून या मालिकेत आता पम्मीची भूमिका ‘देवमाणूस’ या मालिकेतील गाजलेले पात्र ‘मंजुळा’ अर्थात सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव साकारत आहे. या निमित्त बुऱ्हाणनगर येथील सेटवर प्रतीक्षाशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.
पम्मीची व्यक्तिरेखा कशी वाटली?
प्रतीक्षा - पम्मीची भूमिका खूपच छान आहे. ती साकारायला मज्जा येत आहे. अपूर्वा नेमळेकरने हे पात्र मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता माझी जबाबदारी आहे की ती मी आणखी कसदारपणे साकारत आहे.
अपूर्वाने केलेली पम्मी आणि तुझ्या पम्मी बद्दल काय सांगशील?
प्रतीक्षा - पम्मी हे पात्र खूपच नैसर्गिक आहे. त्यासाठी वेगळे असे काहीच करायची गरज वाटली नाही. अपूर्वाने केलेली भूमिका व माझ्या भूमिकेत नक्कीच फरक दिसणार आहे. प्रत्येक कलाकाराची स्वत:ची स्टाईल असते. मी अपूर्वाची नक्कल न करता माझ्या पद्धतीने पम्मी साकारणार आहे.
तू साकारलेली ‘मंजुळा’ खूपच फेमस झाली, काय सांगशील?
प्रतीक्षा - देवमाणूसमधील मंजुळाही नैसर्गिक भूमिका असणारे पात्र होते. त्यात व्यक्तीरेखेला साजेशा दोन्ही बाजू मी माझ्या भूमिकेतून साकरल्या होत्या. यामुळे मंजुळा लोकांना खूपच आवडली.
तू हिंदी आणि तेलगु चित्रपट व मालिकेतही काम केले आहेस. मग मराठी मालिका का निवडली?
प्रतीक्षा - मी काही हिंदी व तेलगु चित्रपटात काम केले आहे. क्राईम पेट्रोल, दिल ढूँढता है अशा काही हिंदी मालिकेतही काम केले आहे. मराठीत काम करण्याची मजा आहे ती हिंदीत नाही. मराठीत जीव ओतून काम करण्यास मोठा वाव असतो.
नगर शहर कसे वाटले?
प्रतीक्षा - मी शाळा-कॉलेजमध्ये असताना ज्युदो खेळायचे. साधारण ७ ते ८ वर्षांपूर्वी मी ज्युदोच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नगरला आले होते. तेव्हापासून नगर मला खूप आवडू लागले. आज पम्मीमुळे मला पुन्हा नगरला रहायला मिळत आहे. लोकांच्या वागण्या-बोलण्यात कृत्रिमपणा जाणवला नाही.
नवीन कलाकारांना काय सांगशील?
प्रतीक्षा- फिल्मी दुनियेत मोठी स्पर्धा आहे. येथे काम मिळविणे आणि ते काम प्रामाणिकपणे करणे यावरच भर दिला गेला पाहिजे. प्रत्येक भूमिकेत शिरून त्या भूमिकेसाठी अभ्यासपूर्ण तयारी करायला हवी. थोड्याशा यशाने हुरळून गेले की कामे मिळणे अवघड होते. यासाठी आपल्या कामावर निष्ठा असावी.