नोकऱ्या मिळणार नसतील, तर डिगऱ्या जाळायच्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:13+5:302021-06-01T04:16:13+5:30
शेवगाव : हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन संपादन केलेल्या डिगऱ्या (पदवी), नोकरी मिळणार नसेल तर जाळायच्या का?, काय करायचे ते ...
शेवगाव : हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन संपादन केलेल्या डिगऱ्या (पदवी), नोकरी मिळणार नसेल तर जाळायच्या का?, काय करायचे ते करा, कोणाला श्रेय घ्यायचे त्याने घ्या, मात्र आम्हाला आरक्षण द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया मराठा समाजातील युवकांनी व्यक्त केल्या. आमदार राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या भावना, सूचना जाणून घेण्यासाठी सोमवारी आयोजित बैठकीत युवकांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, नगरसेवक सागर फडके, बापूसाहेब गवळी, डॉ. नीरज लांडे, तुषार पुरनाळे, प्रा. शिवाजीराव देवढे, राजेंद्र झरेकर, प्रशांत भराट आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणप्रश्नी राजकारण न करता सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे, समाजाला आरक्षण कसे मिळेल, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला कसा न्याय मिळवून देता येईल याचा विचार सर्व पक्षांनी करावा, भाजपने केंद्राकडे समाजाची वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती मांडून पाठपुरावा करावा, असे आवाहन यावेळी युवकांनी केले. शांततेच्या, सरळ मार्गाने मोर्चे काढून आरक्षण मिळणार नसेल, तर अन्य आंदोलनांच्या मार्गाने आरक्षण मिळवू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार कुठे, कसे कमी पडले हे सांगताना आमदार राजळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
---
समाजाच्या भूमिकेबरोबर भाजप...
यावेळी विखे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले. ज्या पद्धतीने भूमिका मांडायला हवी होती, तशी भूमिका या सरकारला मांडता आली नाही. परिणामी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. आरक्षण न मिळाल्याने समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. मराठा समाज यापुढे जी दिशा ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.
310521\1637-img-20210531-wa0036.jpg
शेवगाव येथे मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात शेवगाव येथील मराठा समाजाशी संवाद साधताना भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे व इतर मान्यवर.