उसाला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर आंदोलन - नवलेंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:21 PM2018-02-06T16:21:31+5:302018-02-06T16:22:11+5:30
साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे.
अकोले : साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे. मान्य केलेला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऊसउत्पादक संघर्ष समिती व मार्क्सवादी किसान सभेने दिला आहे.
मान्य केलेला दर देण्यास नकार देणे म्हणजे ऊसउत्पादक शेतक-यांचा विश्वासघात आहे. ठरल्याप्रमाणे बाजारभाव न दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिला. केंद्र सरकारने उसाला ९.५ टक्के साखर उता-यासाठी २५५० रुपये प्रतिटन, अधिक प्रतिएक टक्का वाढीव उता-यासाठी २६८ रुपये इतकी एफ.आर.पी. जाहीर केली. साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये भाव मिळेल, असे धरून हे भाव जाहीर करण्यात आले. संघर्ष समितीने साखरेच्या पडत असलेल्या भावाचा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. साखरेच्या भावावरून उसाचा भाव ठरविण्याऐवजी उसाच्या भावावरून साखरेचा भाव ठरवा व उसाला उत्पादनखर्चावर आधारित किमान समान पहिली उचल देण्यासाठी धोरण निश्चित करावे, अशीही मागणी संघर्ष समितीने केली आहे.