"एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 06:16 PM2024-04-21T18:16:00+5:302024-04-21T18:17:30+5:30
सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत केला पलटवार...
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका असा निरोप महसूलमंत्र्यांनी एका उद्योजकाकडून पाठवला होता, असा गोप्यस्फोट करत शरद पवार यांनी शुक्रवारी नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. यानंत आता, सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
सुजय विखे म्हणाले, "तुमच्यामध्ये आत्मविश्वास होता, मग तुमच्या पक्षात दोन आमदार होते. एक तुमचे नातू (रोहित पवार) आहे, एक माजी मंत्री आहेत, तरीसुद्धा तुम्हाला बाहेरून उमेदवार घ्यावा लागतो आणि हे दोन लोक उभे राहायला तयार झाले नाही. एवढा तुमच्यात आत्मविश्वास होता, तर घरचाच उमेदवार द्यायला हवा होता. आत्मविश्वास कुणाचा डगमगलाय? याचे आत्मचिंतन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने करायचा विषय आहे."
हास्यास्पद विनोद, ऐकावा आणि सोडून द्यावा -
"हे भाषण पश्चिम महाराष्ट्रात चाललं असतं अहिल्यानगरमध्ये हे भाषण चालू शकत नाही. चाळीस वर्ष ज्या व्यक्तींबरोबर आमच्या कुटुंबाचा संघर्ष आहे. चाळीस वर्षांत निरोप पाठवला नाही. आज कशाला पाठवणार. यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेऊ शकत नाही. त्यामुळे हा हास्यास्पद विनोद म्हणून लोकांनी ऐकावा आणि सोडून द्यावा," असा टोमणाही सुजय विखे यांनी यावेळी पवारांना हाणला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दिले होते प्रत्युत्तर -
यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले होते, "शरद पवार यांच्या विधानाला मी फारसे महत्व देत नाही. कारण खोटं बालणे हा त्यांचा धंदाच झाला आहे. पवारांच्या धोरणात कुठे सातत्य आहे. कधी पाहाटे शपथविधी घ्यायला सांगतात, तर कधी भजपाला पाठींबा देऊ काढून घेतात. काँग्रेसमध्ये विदेशी मुद्यावरून ज्यांच्याशी फारकत घेतली, त्यांच्याच पायाशी जाऊन बसयाचे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील सगळे त्यांना सोडून गेले असून, पवार यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र होते. मात्र पवार यांनी नेत्यांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी, उद्योग, हे प्रश्न प्रलंबित असून, जिल्ह्याची पिच्छेहाट झाली आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे."