आघाडी सरकारचे ‘पाण्या’कडे दुर्लक्ष
By Admin | Published: October 15, 2016 12:38 AM2016-10-15T00:38:24+5:302016-10-15T00:56:29+5:30
अहमदनगर : पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे
अहमदनगर : पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे. या गावातून आतापर्यंत अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी विविध कामाचा आदर्श घेवून गेलेले आहेत. जे काम हिवरेबाजारने केले त्याचे अनुकरण ‘आघाडी सरकार’ करू शकले नाही. आघाडी सरकारचे जलसंधारण आणि पाणी या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मंत्री मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ५० सरपंच, ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि उपवनसरंक्षक ए. लक्ष्मी यांनी सर्वांचे स्वागत केले.
गावातील शिवार फे री, गवत कापणी शुभारंभ, वनधन-जनधन योजनेचा शुभारंभ, जनावरांचा गोठा भेट यानंतर मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने हिवरेबाजार प्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गतवर्षी अर्थसंकल्पात १ हजार ७२ कोटी रुपये घोषित केले. चालू वर्षी ७ हजार ८५० कोटी रुपये मंजूर केले असून पुढील तीन वर्षात प्रत्येकी ५ हजार कोटी प्रमाणे १५ हजार कोटी शेती, पाणी, जलसंधारण कामासाठी नाबार्डकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी गावातील लोकांनी पुढाकार घेतल्यास गाव हिवरेबाजारप्रमाणे आदर्श होईल. हिवरेबाजार गावाच्या कामातून बोध घेण्यासारखे खूप आहे. या गावाचे नाव देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे.
हिवरेबाजारचा आदर्श राज्यातील गावांनी घेतल्यास महाराष्ट्राची जीवनशैली बदलेल असा आशावाद व्यक्त केला. जलसंधारण मंत्री शिंदे यांनी मंत्री झाल्यावर गावकऱ्यांना कार्यक्रम घेण्यासाठी मंत्र्यांची तारीख घ्यावी लागते. मात्र, हिवरेबाजार गावाची तारीख घेण्याची वेळ आमच्यावर आली. माणसाची मानसिकता बदलल्याशिवाय सुधारणा होत नाही.
(प्रतिनिधी)
मंत्री मुनगंटीवार, शिंदे आणि लोणीकर यांनी हिवरेबाजार गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी अंगणवाडीतील मुले होती. या मुलांसाठी केळी आणि अंडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ठिकाणी असणारी अंडी पाहून मंत्री शिंदे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार हे शाकाहारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांनी हजरजबाबीपणे शाकाहारी मंत्र्यांच्या हस्ते केळी वाटप करता येतील, असे सुचवले. त्यावर पुन्हा एकच हशा पिकला. अखेर मुनगंटीवार यांनी स्वत:च्या हाताने केळी वाटप केले.
४त्यानंतर मंत्र्यांचा ताफा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे वळाला. त्या ठिकाणी दुसरीच्या वर्गातील मुलांकडून कविता, गाणी म्हणून घेतली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून मंत्रीही अवाक झाले. शाळेत ना नफा ना तोटावर विद्यार्थी शालेय साहित्य विक्री करत असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या उपक्रमाचे मंत्र्यांनी कौतुक केले.
हिवरेबाजारमध्ये एकही दारिद्रय रेषेखाली कुटुंब नसल्याचे पवार यांनी सांगताच मंत्री मुनगंटीवार त्यांच्या मतदारसंघातील सरपंचांना म्हणाले, आपल्याकडे मंत्री झाल्यानंतरही दारिद्र्य रेषेत नाव ठेवण्याचा आग्रह धरण्यात येतो. यावर एकच हशा पिकला. सर्वांनी हिवरे बाजारची शिवार फेरी केली.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या ईबीसी सवलतीच्या निर्णयावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना सवलती देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर एकदम अतिरिक्त भार पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सवलतीचा हुशार, होतकरू आणि आर्थिक कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.