शासनाच्या मदतीपासून ड्रेपरी व्यवसाय दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:25 AM2021-04-30T04:25:21+5:302021-04-30T04:25:21+5:30

संगमनेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता वारंवार लॉकडाऊन करावे लागत आहे. शासन नियमावली जाहीर करते. त्यात काय सुरू, ...

Ignoring the draperies business with the help of the government | शासनाच्या मदतीपासून ड्रेपरी व्यवसाय दुर्लक्षित

शासनाच्या मदतीपासून ड्रेपरी व्यवसाय दुर्लक्षित

संगमनेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता वारंवार लॉकडाऊन करावे लागत आहे. शासन नियमावली जाहीर करते. त्यात काय सुरू, काय बंद याबाबत सूचना दिल्या जातात. ज्यांचे लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांना मदत व साहाय्य करण्यात येते. असे असताना मात्र शासनाच्या मदतीपासून ड्रेपरी व्यवसाय पूर्णपणे दुर्लक्षित आहे, अशी खंत संगमनेरातील ड्रेपरी व्यावसायिकांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक क्षेत्रातला हा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. बहुतेक कलावंत, सांस्कृतिक चळवळींशी संबंधित लोक व महिला तो चालवतात. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, मालिका, चित्रपट, लग्नसमारंभ, विविध सोहळे, उत्सव यांना कपडे, साहित्य व दागिने भाड्याने देण्याचा हा व्यवसाय आहे. त्यासाठी या व्यावसायिकांनी लाखो रुपये भांडवल गुंतवले आहे. कपड्यांची किंमत बघता ते अनेकवेळा भाड्याने गेल्यावर भांडवल वसूल होते व त्यानंतर नफा सुरू होतो. तोपर्यंत कपडा जुना होऊन त्याचे भाडेही कमी येते.

साधारण जानेवारी महिन्यानंतर शालेय कार्यक्रम सुरू होतात. त्या अगोदर लाखो रुपये खर्च करून नवीन माल खरेदी करावा लागतो. परंतु, गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये अजूनही बंदच असल्याने ड्रेपरी व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. इतर व्यवसायांचा शासनाने विचार केला, पण ड्रेपरीवाले तसेच राहिले. भांडवल अडकल्याने ते नवीन

व्यवसायही करू शकत नाहीत. बँकांचे हप्ते मात्र चालू आहेत. दुकानाचे भाडे, लाइटबिल, कामगारांचे पगार थांबलेले नाहीत. कुटुंब कसे चालवायचे, हा मोठा प्रश्न सध्या ड्रेपरी व्यावसायिकांसमोर आहे. काही ड्रेपरी व्यावसायिकांनी

कवडीमोल भावाने दुकाने विकायला काढली आहेत. आमची संघटना सक्षम नसल्याने आमचे म्हणणे शासनदरबारी पोहोचत नाही. आमचा शासनाने विचार केला पाहिजे. आम्ही हातावर हात ठेवून बसलो आहोत. कुटुंबाची उपासमार होते आहे. शासनाने आमच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे संगमनेरातील ड्रेपरी व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---------------

मी अभिनेता असून व मालिकांची निर्मिती करतो. त्यामुळे या क्षेत्रातल्या अडचणी माहीत आहेत. म्हणून मी व पत्नी वंदनाने हा व्यवसाय छंद म्हणून सुरू केला. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना अल्प दरात साहित्य व कपडे उपलब्ध करून दिले. आज व्यवसाय खूप मोठा झाला आहे. पण, लॉकडाऊनमुळे तो बंद आहे. आशा आहे की, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.

-वसंत बंदावणे, निर्माता व ज्येष्ठ रंगकर्मी, संगमनेर

----------------

ड्रेपरी व्यवसाय सुरू करण्यासाठी बँका व बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले. मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवले. त्यातून हा व्यवसाय सुरू केला. परंतु, १५ महिन्यांपासून तो पूर्णपणे ठप्प आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.

-संगीता शहाणे, ड्रेपरी व्यावसायिका, संगमनेर

Web Title: Ignoring the draperies business with the help of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.