दारुबंदीसाठी मी पाठीशी
By Admin | Published: October 29, 2016 12:09 AM2016-10-29T00:09:41+5:302016-10-29T00:43:13+5:30
शेवगाव : हातगाव व घोटण येथील बहुसंख्य महिला दारूबंदीसाठी देत असलेला लढा प्रशंसनीय आहे. प्रशासनाने त्यांच्या भावनांची दखल घेऊन दारूबंदीसाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी.
शेवगाव : हातगाव व घोटण येथील बहुसंख्य महिला दारूबंदीसाठी देत असलेला लढा प्रशंसनीय आहे. प्रशासनाने त्यांच्या भावनांची दखल घेऊन दारूबंदीसाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी. ग्रामविकासात ग्रामसभेला सर्वोच्च महत्व आहे. गावगुंड ग्रामसभा उधळत असतील तर मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून या दोन्ही गावात दारूबंदीसाठी मदत करील, अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या महिलांना दिली.
या दोन्ही गावांमध्ये दारूबंदी होण्यासाठी घोटण व हातगाव येथील महिलांनी अमोल घोलप यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हजारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महिलांनी घोटण येथील दारूबंदीसाठीची ग्रामसभा गावगुंडांचा वापर करून उधळली गेल्याचे तसेच या ग्रामसभेसाठी प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. घोलप यांनीही दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी कार्यकर्त्यांना भेटण्यास व कार्यवाही करण्यात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला.
यावेळी दारूबंदी संघर्ष आंदोलनाचे दत्तात्रय फुंदे, संजय टाकळकर, मीरा मोटकर, मंदा मोटकर, गीता थोरवे आदी हजर होते.