ग्रीन झोन’ पट्ट्यातच बेकायदेशीर बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:47 PM2020-03-05T16:47:22+5:302020-03-05T16:47:29+5:30
‘लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सीना नदी लगतच्या शेतजमिनीत खुलेआम अवैध प्लॉट पाडून विक्री सुरू आहे. ग्रीन झोनमध्येच अतिक्रमण करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. सावेडीत पंपिंग स्टेशन रोड ते सत्यम हॉटेल रस्त्यावर सीना नदीच्या बाजूला पूररेषेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. यात एका नेत्याच्या हेल्थक्लबचे कामही सुरु आहे. ही कामे नियमानुसार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सीना नदी लगतच्या शेतजमिनीत खुलेआम अवैध प्लॉट पाडून विक्री सुरू आहे. ग्रीन झोनमध्येच अतिक्रमण करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. सावेडीत पंपिंग स्टेशन रोड ते सत्यम हॉटेल रस्त्यावर सीना नदीच्या बाजूला पूररेषेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. यात एका नेत्याच्या हेल्थक्लबचे कामही सुरु आहे. ही कामे नियमानुसार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेने वाडियापार्क येथील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत प्रशासनाने पाठ थोपटून घेतली. मात्र शहरातील ओढे व नाल्यातील बांधकामाबाबत महापालिका मूग गिळून गप्प असल्याचे दिसते.
सीना नदीलगत नागापूर, बोल्हेगाव, बोरुडेमळा, नालेगाव, काटवन खंडोबा परिसर, अमरधाम, पुणे रोड, बुरुडगाव आणि अन्य भागातील ग्रीन झोनमध्ये प्लॉटींग करून बांधकामे सुरू आहेत. सत्यम हॉटेल ते पंपींग स्टेशन रस्त्यालगत ग्रीन झोनमध्ये मंगल कार्यालये, हेल्थ क्लब, हॉटेल्सची कामे सुरू आहेत. महापालिका प्रशासनाची यास परवानगी आहे का? असा प्रश्न केला जात आहे.
इमारत बांधून झाल्यानंतर कुणी तक्रार केली तरच कारवाई होते. तक्रारीची दखल घेऊन महापालिका संबंधितांना नोटीस बजावते. त्याविरोधात संबंधित व्यक्ती न्यायालयात धाव घेतात. त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून महापालिकेचे अधिकारीही वेळ मारून नेतात, अशी कार्यपद्धती महापालिकेत विकसित झाली आहे. महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे आहे. गतवर्षीही त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार असताना त्यांनी सीना स्वच्छतेची मोहीम राबविली. आयुक्त आता या पूररेषा भागाचा फेरफटका करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे या भागातील नगरसेवकही अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करतात. काही नगरसेवकांनीच अशी बांधकामे केल्याची चर्चा आहे. नगरसेवकांनी अतिक्रमण केले तर त्यांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. महापालिकेने सीना नदी काढाचे सर्वेक्षण केल्यास किती लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणे केली ते समोर येणार आहे. या बांधकामांवर हातोडा पडणार का? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.