पथकाची पाठ फिरताच बेकायदा दारू विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:38+5:302021-05-26T04:21:38+5:30
लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबात रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुष महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करीत आहेत. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे ...
लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबात रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुष महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करीत आहेत. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबांसाठी आवश्यक आहे, असे पत्र आंदोलनाने गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्त यांना लिहिले होते.
अकोलेतील एका देशी दारू दुकानाबाहेर दारू विक्री करताना या पथकाने कारवाई केली. राजूर येथील अवैध विक्रीवर गुन्हा दाखल केला. या पथकातील नगर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने राजूर, कोतुळ येथे दारू विक्रेत्यांना सावध केल्याने कारवाईवर परिणाम झाला हे पुराव्यानिशी आंदोलनाने उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले आहे. आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादन शुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठीशी घालत असल्याचे वास्तव पुढे येते आहे. येथील अधिकारी तातडीने बदलावेत, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे. इतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदी पुलाजवळ चोरून दारू विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीत खुलेआम दारू विकली जात आहे.
...........
परवाने रद्द करावेत
एकीकडे शोकाकुल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना अकोलेचे नवीन सहायक पोलीस निरीक्षक यांनी पायबंद घालावा. अकोले व राजूरमधील गेल्या ५ वर्षांतील झालेल्या कारवाया एकत्र करून त्या आधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचे परवाने रद्द करावेत. राजूरमध्ये तडीपारी करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष ॲड. रंजना गवांदे, नीलेश तळेकर, संतोष मुतडक, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके, भाऊराव उघडे व हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.