लॉकडाऊन काळात स्कॉर्पिओमधून अवैध दारूची वाहतूक : साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:15 PM2020-04-08T16:15:16+5:302020-04-08T16:18:25+5:30
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी नगर-पुणे रोडवरील सुपा परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असताना पाठलाग करुन एक स्कार्पिओ पकडून त्यामधून देशी-विदेशी एकूण ८ लाख ५३ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी नगर-पुणे रोडवरील सुपा परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असताना पाठलाग करुन एक स्कार्पिओ पकडून त्यामधून देशी-विदेशी एकूण ८ लाख ५३ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी आरोपी दिपक आनंदा पवार (वय ३९ रा. सुपा ता.पारनेर) याला अटक करण्यात आली आहे. नगर-पुणे रोडने सुपा हद्दीतून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली यावेळी स्कार्पियोमधून देशी दारु १९७ बाटल्या, विदेशी दारू मॅकडॉल किस्कीच्या ४०६ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ११३ बाटल्या, ओ. सी. व्हिस्कीच्या ४४ बाटल्या, मॅकडॉल रम २८ बाटल्या, किंगफिशर बिअरच्या २५ बाटल्या असा एकुण ८१३ बाटल्या व वाहनासह अंदाजे ८ लाख ५३ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ विभागाचे निरीक्षक संजय सराफ, निरीक्षक आण्णासाहेब बनकर, दुय्यम निरीक्षक विजय सुर्यवंशी, निरीक्षक महीपाल धोका, वर्षा घोडे, जवान अरुण जाधव, वाय. बी. मडके, पांडुरंग गदादे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्येही दारूची वाहतूक
कोरोना लॉकडॉऊनमुळे सध्या परमीटरूम, वाईनशॉप, हॉटेल व देशी दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे दारूचा मोठा काळाबाजार सुरू झाला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दारू तयार करून विकली जाते तर विदेशी दारूचीही तस्करी सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाने पथकांची नियुक्ती करून अवैध दारू विक्री रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.