बेकायदेशीररित्या सावकारकी ; साकूरमधील तिघांविरोधात गुन्हा दाखल
By शेखर पानसरे | Published: June 8, 2024 06:00 PM2024-06-08T18:00:27+5:302024-06-08T18:00:44+5:30
महाराष्ट्र सावकारकी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
घारगाव : बेकायदेशीररित्या सावकारकी करणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील तिघांविरोधात शुक्रवारी (दि.०७) घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या घरातून खरेदीखत, इसारपावती, स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश, उसनवारी पावती, रजिस्टर आदी वेगवेगळे कागदपत्र हस्तगत करण्यात आले. महाराष्ट्र सावकारकी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
सचिन बन्सी डोंगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे व राहुल किसन डोंगरे (रा. साकूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. राजेंद्र वाकचौरे (सहकार अधिकारी श्रेणी-१ अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. साकूर येथील विलास दौलत वाकचौरे व संगीता विलास वाकचौरे यांनी २९ जानेवारी २०२४ ला राहुल किसन डोंगरे आणि सचिन बन्सी डोंगरे (दोघेही रा. साकुर, ता. संगमनेर) यांच्याविरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला होता.