सावरगाव घुले गावात अवैधरित्या दारूविक्री; ग्रामस्थांचे उपोषण
By शेखर पानसरे | Published: January 13, 2024 04:52 PM2024-01-13T16:52:08+5:302024-01-13T16:52:19+5:30
सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अवैधरित्या मद्यविक्री सुरू आहे.
घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अवैधरित्या दारूविक्री होते आहे. त्यामुळे गावात सामजिक स्वास्थ बिघडले असून अल्पवयीन मुलांना सुद्धा दारूचे व्यसन लागले आहे. अवैधरित्या दारूविक्री विरोधात शनिवारी (दि.१३) ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दारूविक्री करणाऱ्यांवर कायदेशीर पद्धतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन उपसरपंच नामदेव घुले यांनी दिले, त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अवैधरित्या मद्यविक्री सुरू आहे. त्या संदर्भाने दारूविक्री करणाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी आणि नोटीसचे द्वारे कळवूनही अवैधरित्या मद्यविक्री बंद झालेली नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैधरित्या दारूविक्री सुरूच ठेवली. अवैधरित्या दारूविक्री करणे, दारूचा साठा जवळ बाळगणे. असे प्रकार सुरू आहेत. उपद्रवाला कारणीभूत ठरणाऱ्या आणि उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.