लॉकडाऊन काळातही अवैध वाळू उपसा : १२ लाखांचा मुद्देमाल जप्त घारगाव पोलिसांची कारवाई : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 03:50 PM2021-05-31T15:50:33+5:302021-05-31T15:50:58+5:30
घारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन असताना संगमनेर तालुक्यातील पठारभागात मात्र अवैध वाळू उपसा सुरु असून माहुली परिसरात माहुली ते हिवरगाव पठार रस्त्यावर रविवारी सायंकाळी सात वाजलेच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करणारा एक आयशर घारगाव पोलिसांनी पकडला.

यात तीन ब्रास वाळूसह सुमारे १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
संगमनेर तालुक्यातील साकुर येथून हिवरगाव पठार ते माहुली या रस्त्याने अवैध वाळूची वाहतूक करणारा आयशर जाणार असल्याची खबर घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली. त्याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे व संतोष फड हे ऑक्सिजनचा टँकर नाशिक सीमेवर सोडून माघारी येत असताना पाटील यांनी दुरध्वनीवरून फड यांना माहिती दिली. त्यानुसार रविवारी सायंकाळी सात वाजलेच्या सुमारास विनानंबरचा अवैध वाळूची वाहतूक करणारा आयशर पोलिसांनी ताब्यात घेतला. चौकशीअंती कोणत्याही प्रकारचा वाळूचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान , घारगाव पोलिसांनी तीन ब्रास वाळूसह आयशर वाहन असा एकूण १२ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश बाळासाहेब वराळे (रा. साकुर,ता.संगमनेर ) याच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल आर.व्ही.खेडकर करत आहे.