गोदावरी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:54+5:302021-04-28T04:21:54+5:30
सरपंच शंकर विटेकर यांच्यासह उपसरपंच रेवन्नाथ औताडे व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात वाळू उपशामुळे ...
सरपंच शंकर विटेकर यांच्यासह उपसरपंच रेवन्नाथ औताडे व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात वाळू उपशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
सराला येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना वाळू तस्करांकडून दमबाजी व धमकी दिली जात आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपूरक विहिरी आहेत. त्यांना वाळू उपशामुळे धोका पोहोच आहे, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने गावकरी लॉकडाऊनचे कसोशीने पालन करत आहेत. सर्व शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन परिसरातील वाळू तस्करांनी सराला हद्दीतील जुने गावठाण व नवीन गावठाण लगतच्या नदीपात्रातून वाळू उपशाचा धडाका लावला आहे. रात्रभर जेसीबी मशीन, डंपर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेसुमार वाळूचोरी सुरू आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी जाण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडी गावास पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
------