अवैधरीत्या वाळू वाहतूक; ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:15+5:302021-01-22T04:20:15+5:30
संगमनेर : नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुरुवारी ( दि.२१) संगमनेर ...
संगमनेर : नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुरुवारी ( दि.२१) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपासमोर करण्यात आली.
मोहन भीमाजी जेडगुले ( वय २०, सायखिंडी फाटा, ता. संगमनेर), शेहबाज शेख व इस्माईल पठाण (दोघेही रा. रहमतनगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जेडगुले याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
नदीपात्रातून वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला त्यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ट्रॉलीतील १ ब्रास वाळू तसेच ट्रॉली, ट्रॅक्टर असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.