काळकूपमध्ये दुस-या दिवशीही अवैध वाळूउपसा : माहिती देऊनही महसूलचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:18 PM2017-11-20T18:18:07+5:302017-11-20T18:19:52+5:30
काळकूप (ता. पारनेर) येथील नदीवर अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. येथे शनिवारपासून वाळूउपसा होत असून, लोकमतनेही सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून तहसीलदारांना चोरट्या वाळूवाहतुकीची कल्पना दिली. मात्र दुसºया दिवशीही यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.
अहमदनगर : काळकूप (ता. पारनेर) येथील नदीवर अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. येथे शनिवारपासून वाळूउपसा होत असून, लोकमतनेही सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून तहसीलदारांना चोरट्या वाळूवाहतुकीची कल्पना दिली. मात्र दुसºया दिवशीही यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.
काळकूप येथे गावालगत कापरी नदी असून, ही पुढे भाळवणीला जाते. या नदीत शनिवारपासून जेसीबी व ट्रॅॅक्टर लावून वाळूउपसा होत असल्याची माहिती काही जणांनी माध्यमांना दूरध्वनी करून कळवली. त्यावर ‘लोकमत’ने पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांना दूरध्वनीवर या प्रकाराची माहिती दिली. सागरे यांनी वाळूउपसा होत असेल, तर त्वरित कारवाई करू, असे सांगितले. मात्र त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले नाही.
सोमवारपर्यंत हा उपसा सुरू होता. सोमवारी पुन्हा तहसीलदार सागरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. माध्यमांनी माहिती देऊनही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल महसूल विभागाकडून कशी आणि केव्हा घेतली जात असेल, याची कल्पना येते. जिल्ह्यात सध्या महसूलतर्फे कोणताही अधिकृत वाळूठेका दिलेला नाही. कोणत्याही वाळूसाठ्याचा लिलाव झालेला नसताना अवैध वाळूउपसा मात्र जोरात सुरू आहे. महसूल विभाग मात्र याबाबत गप्प आहे.