दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्या; कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन
By शेखर पानसरे | Published: June 28, 2024 12:56 PM2024-06-28T12:56:36+5:302024-06-28T12:56:51+5:30
कोल्हार-घोटी राज्य मार्गावर चिखली गावात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
शेखर पानसरे , लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्यावा, जो व्यावहारिक दृष्ट्या देणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा पासून दुधाचे दर पडले आहेत, तेव्हापासून आतापर्यंत दुधाच्या दरातील फरकाची नुकसान भरपाई प्रति लिटर १५ रूपये याप्रमाणे रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करावी. आदी मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.२८) कोल्हार-घोटी राज्य मार्गावर चिखली गावात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
शिव आर्मी दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. यात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दुधाला हमीभाव द्यावा, ही देखील मुख्य मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.