लसीकरणाचा केरळ पॅटर्न नगरसह राज्यात राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:55+5:302021-05-13T04:21:55+5:30
अहमदनगर : कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही. अहमदनगरसह राज्यात केरळचा लसीकरण ...
अहमदनगर : कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही. अहमदनगरसह राज्यात केरळचा लसीकरण पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकारकडून काेरोनाला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे स्वागतच आहे. परंतु, केरळ सरकारने नियोजनबद्धरीत्या उपाययोजना केल्याने मृत्युदरात घट झाली आहे. तेथील सरकारने प्रभागनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होत असून, मृत्युदरात घट झाली आहे. तसेच कोरोनावरील लसीकरणातही केरळ राज्याने आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारकडून केरळ राज्यासाठी ७३ लाख ३८ हजार ८०६ लसीचे डोस उपलब्ध झाले. मात्र, तेथील आरोग्ययंत्रणेने एकही डोस वाया न घालविता ७४ लाख २६ हजार १६८ नागिरकांना लस दिली. याचा अर्थ तेथील यंत्रणेने अतिरिक्त ८७ हजार ३५८ नागरिकांना लस दिली. तसेच कोरोनाच्या संकट काळात मोफत वीज, पाणी आणि प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचा घरपोहोच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे केर राज्याचा पॅटर्न प्रभावी ठरत असून, हा पॅटर्न अहमदनगरसह राज्यात राबविण्यात यावा, अशी मागणी लांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.