नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे
By Admin | Published: April 19, 2017 04:32 PM2017-04-19T16:32:26+5:302017-04-19T16:32:26+5:30
नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़
आॅनलाइन लोकमत
राळेगणसिद्धी (अहमदनगर) दि़१९- महाराष्ट्र राज्य नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यातील तीन मुद्यांवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली़ अण्णांनी सुचविलेल्या ग्राम सुरक्षा दलाला या कायद्याने मूर्त स्वरुप दिले असून, त्याची अंमलबजावणी नगरमधून सुरु होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली़
बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे मंत्री बावनकुळे यांनी भेट घेतली़ नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे़ या मसुद्याबाबत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या आहेत़ हा मसुदा अंतिम टप्प्यात असून, या कायद्याद्वारे अण्णा हजारे यांनी सुचविलेले ग्रामसुरक्षा दल अस्तित्वात येणार आहे़ या ग्रामसुरक्षा दलाचा पथदर्शी प्रयोग नगर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यानंतर राज्यभर ग्रामसुरक्षा दल अस्तित्वात येणार आहे़ ग्रामसुरक्षा दलाच्या सुचनेनुसार पोलिसांनी १२ तासाच्या आत दारुबंदीबाबत कारवाई करणे आवश्यक आहे़ ही कारवाई करण्यास अथवा ग्रामसुरक्षा दलांना सहकार्य नाकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे़ ग्रामसुरक्षा दलांना विशेषाधिकार देण्याबाबत हजारे व बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली़ हे ग्रामसुरक्षा दल ३० जूनपर्यंत स्थापन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, ग्रामसुरक्षा दलाच्या प्रमुखांची १५ जून रोजी राळेगणसिद्धी येथे बैठक घेण्याचा निर्णय हजारे व बावनकुळे यांच्यातील चर्चेदरम्यान घेण्यात आला आहे़