कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:22+5:302021-05-13T04:20:22+5:30

श्रीरामपूर : सरकारने ज्येष्ठ नागरिकांबरोबर १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण हाती घेतल्यामुळे लसीच्या एकेका थेंबाला महत्त्व प्राप्त झाले ...

Importance of every drop of covid vaccine | कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व

कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व

श्रीरामपूर : सरकारने ज्येष्ठ नागरिकांबरोबर १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण हाती घेतल्यामुळे लसीच्या एकेका थेंबाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लसीच्या बाटली किंवा कुपीतील एकही डोस वाया जाणार नाही, याची आरोग्य कर्मचारी खबरदारी घेत आहेत.

वाहतूक, साठवणूक व हाताळणीतील चुकांमुळे लसीचे डोस काही प्रमाणात वाया जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दहा टक्‍क्‍यांपर्यंत लस वाया जाते, अशी एक मर्यादा ठरवून दिली आहे. लसीकरण मोहीम देशभरात सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात त्याला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे बाटलीतील लस एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर इतर डोससाठी दुसऱ्या व्यक्तीची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे लसीची बाटली वाया जाण्याचा धोका उद्भवत होता. आता मात्र लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. ज्येष्ठांबरोबरच १८ ते ४४ वयोगटातील तरुणही केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यातच लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्रावरून लसीविना परतण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

-----

अशी असते लसीची मात्रा

एका बाटली किंवा कुपीत पाच मिली किंवा दहा मिली लसीची मात्रा असते. यातून दहा लोकांना लस देता येते. मात्र, कुणालाही कमी मात्रेचा डोस मिळू नये याकरिता कंपन्यांकडून १० मिलीपेक्षा काही अंशी जास्त लस एका बाटलीमध्ये दिली जाते.

-----

लसीकरण मोहिमेतील नर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी हे आपल्या कामात निपुण आहेत. अनुभवामुळे आता बाटलीतील डोस वाया जाणार नाहीत, याची ते पुरेपूर काळजी घेतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकरण करणे शक्य झाले आहे.

-योगेश बंड, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर

----

जिल्ह्याला दररोज सरासरी १० हजार डोस प्राप्त होतात. यात प्रत्येक दिवशी हे प्रमाण वेगवेगळे असते. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ४७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील मात्र केवळ २० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

-----

डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प

केंद्र सरकारने डोस वाया जाण्याचे प्रमाण दहा टक्के गृहीत धरले असले तरी जिल्ह्यात मात्र त्यापेक्षा खूप कमी लसींची मात्रा वाया जात आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

Web Title: Importance of every drop of covid vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.